मुंबई: भाजप नेते आणि आपल्या वक्तव्यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चेत येणारे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज (Mohit Kamboj) पुन्हा एकदा आपल्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मिडियावरती एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये एका अकाऊंटला टॅग करत धमकी दिल्याचं दिसून आलं. कंबोज (Mohit Kamboj) यांच्या या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी गजाभाऊ नावाच्या एका एक्स युजरला (पुर्वीचे ट्विटर) टॅग करत एक पोस्ट केलीय, त्यामध्ये त्यांनी थेट धमकी दिल्याचं दिसून येत आहे. कंबोज (Mohit Kamboj) यांनी गजाभाऊ नावाच्या युजरला टॅग करून पोस्ट लिहली त्याने देखील मोहित कंबोज यांना उत्तर दिलं आहे. यावरून आता विरोधकांनी देखील संताप व्यक्त करत कंबोज यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची पोस्ट शेअर करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपलाही धारेवर धरलं आहे. दानवेंनी 'या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे 'कंभोजीकरण' झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज 'ह्याला उचल, त्याला उचल'ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट गजाभाऊ', अशी पोस्ट लिहली आहे. तर कंबोज ज्या अकाऊंंटला टॅग करून धमकीवजा पोस्ट लिहली आहे, त्याला अंबादास दानवे काळजी करू नका असं म्हणाताना दिसत आहे.
अंबादास दानवे यांची पोस्ट काय?
"या असल्या कारभाऱ्यांनी भाजपचे 'कंभोजीकरण' झाले आहे. तत्ववादी नेत्यांचा पक्ष आज 'ह्याला उचल, त्याला उचल'ची भाषा करतो जे यांना अजिबात शोभत नाही.. महाराष्ट्रात अश्या धमक्यांना थारा नाही, मराठी माणसाबद्दल तर अजिबात नाही! फिकर नॉट गजाभाऊ," अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोशल मिडीयावरही अनेकदा ट्विटर वॉर पाहायला मिळालं. यामध्ये गजाभाऊ आणि भाऊ गँग नावाचे एक्स हँडल्स हे वेळोवेळी राजकीय विषयांवर पोस्ट करत असल्याचं दिसून आलं. त्यांनी वारंवार महायुती, भाजप, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत पोस्ट शेअर केल्याचं दिसून आलं. तर या पोस्टवरून भाजप नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे कट्टर म्हणून ओळखले जाणारे मोहित कंबोज यांनी त्या अकाऊंटला टॅग करत आता निवडणुकीनंतर धमकी दिल्याचं बोललं जातं आहे.
मोहित कंबोज यांची पोस्ट
'माझं पुढचं टार्गेट गजाभाऊ' असं म्हणत मोहित कंबोज यांनी @gajabhauX या एक्स आयडीला टॅग केलं आहे. तर पुढे 'धरती पे किधर भी होगे , उठा के लाए गे !' असा इशारा देखील मोहित कंबोज यांनी दिला आहे. 'हर हर महादेव' असं लिहून ही पोस्ट सेव्ह करुन ठेवा असंही कंबोज यांनी म्हटलं आहे. त्या पोस्टवर गजाभाऊ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन मोहित कंबोज यांना उत्तर देण्यात आलेलं आहे. मोहित कंबोज यांच्या ट्विटवर खाली गजाभाऊ या अकाऊंटने उत्तर देताना, "येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये... मी पण वाट बघतोय...", असं लिहलं आहे.
गजाभाऊ कोण आहे?
निवडणुकीच्या काळापासून या सोशल मिडिया अकाऊंटवरून अनेक पोस्ट शेअर केल्याचं दिसून आलं आहे. जवळपास या सर्व पोस्टमध्ये भाजप आणि महायुतीमधील पक्षांना लक्ष करून या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर करण्यात आलेल्या आहेत. तर अकाऊंटच्या बायोमध्ये "जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग" असं लिहिलं असून, हे हँडल व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटचे 27.6K इतके फॉलोअर आहेत.