नवी दिल्ली : भारताचा कॉमनवेल्थ आणि एशियाड सुवर्णविजेता पैलवान बजरंग पुनियाची केंद्र शासनाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येणारा खेलरत्न हा क्रीडाक्षेत्रातला केंद्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
केंद्र शासनाच्या बारा सदस्यीय समितीने बजरंग पुनियाची एकमताने या पुरस्कारासाठी निवड केली आहे. 29 ऑगस्ट या राष्ट्रीय क्रीडादिनी खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि रोख साडेसात लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आजवरच्या इतिहासात सुशीलकुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक या पैलवानांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
गेल्या वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू हिला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
बजरंगने मागील वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले होते. गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही याच वजनी गटात त्याने सुवर्ण पटकावले आहे. तसेच पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्येदेखील त्याच्याकडून देशाला पदकाची अपेक्षा आहे.