दक्षिण मध्य मुंबई विभागाच्या मध्यभागी असलेला धारावी मतदारसंघ. मुळात मुंबई शहर आणि उपनगराला हा जोडणारा भाग मुंबईच्याही मध्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. धारावी म्हटलं की नजरेसमोर येते ती आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी. इथला बहुसंख्य मतदार मुस्लिम असला तरी त्याखालोखाल दक्षिण भारतीय, मराठी आणि गुजराती मतदारही इथं आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम साहजिकच इथल्या उमेदवार निवडीवर आणि आमदारनिवडीवर देखील होतो.


अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात प्रामुख्याने काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे. (अपवाद साल 1999 चा, जेव्हा इथे शिवसेनेचे उमेदवार बाबुराव माने निवडून आले होते.) त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसचा भक्कम गड मानला जातो. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी खासदारकीकडे आपला मोर्चा वळवल्यापासून त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या मतदारसंघातून 2004, 2009 आणि 2014 सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते इथं असले तरी अंतर्गत झोपडपट्टी भागात त्यांची म्हणावी तशी पकड नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीतही बाबूराव माने 15 हजार मतांच्या फरकाने पडले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आलेली भगव्याची लाट पाहता बाबूराव माने पुन्हा धारावीवर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र जर युती निवडणुकीच्या आधीच जाहीर झाली तर भाजपच्या दिव्या ढोले की बाबूराव माने यांनी इथून उमेदवारी मिळणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे. समजा जर गेल्यावेळेप्रमाणे युती न होता शिवसेना-भाजपनं स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा काँग्रेसलाच होऊ शकतो.

धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावी पुनर्विकासाचा मुद्दा प्राधान्यानं तडीस लावणार असल्याचं जाहिर केलं होतं. मात्र गेल्या पाच वर्षांत त्याचं काय झालं? असा सवाल इथले मतदार विचारत आहेत. जागतिक पातळीवर निविदा काढूनही त्याला प्रतिसाद का मिळाला नाही, याचं उत्तर अनुत्तरीत आहे. शिवाय इथल्या नागरी समस्या, प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेले लघुउद्योग, इथलं जगप्रसिद्ध लेदर मार्केट, नागरिकांच्या समस्या, त्यांना न मिळणाऱ्या सोयीसुविधा, क्रीडा संकुलाची वानवा हे मुद्दे विचारात घेतले तर सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या वर्षा गाकवाड यांनी या विभागासाठी काय केलं? असा सवालही इथले नागरिक विचारत आहेत. त्यामुळे यंदा इथले नागरिक कुणाच्या नावाला पसंती देतात? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी
वर्षा गायकवाड, काँग्रेस – 47,718
बाबुराव माने, शिवसेना – 32,390
दिव्या ढोले, भाजप – 20,763
नोटा – 1,436
मतदानाची टक्केवारी – 49.42 %