मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या या घोषणेने भाजपसह (BJP) महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा करुन एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. हा निर्णय घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे डॅमेज कंट्रोल करुन विरोधकांच्या टीकेची धार बोथट करुन टाकल्याचे बोलले जात आहे.


फडणवीसांनी इतका अनपेक्षित निर्णय का घेतला?


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातच नव्हे देशभरातील भाजप पक्षसंघटनेत मोठे बदल होतील, अशी चर्चा आहे. येत्या काही महिन्यांमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सरकारमध्ये सामील झाले तेव्हाही देवेंद्र फडणवीसांचा सूर सरकारबाहेर राहून काम करण्याचाच होता. पण भाजप पक्षश्रेष्ठींच्या विनंतीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. पण कालच्या निकालानंतर एक स्पष्ट झाले की, यामुळे विधानसभा निवडणुकीतही मोठा फटका बसू शकतो, याचा अंदाज देवेंद्र फडणवीसांना आला. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीपूर्वी जोमाने काम करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भाजपला उभारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर राहून पक्ष वाढवायचा आहे, असे सांगितले जाते. 


लोकसभा निकालानंतर मविआचं मोमेंटम विधानसभेला तोडण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय


लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहण्याची चिन्हं आहेत. मविआचा हा विजयी मोमेंटम तोडायचा असेल तर आणि भाजपला पुन्हा सत्तेवर यायचं असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची भूमिका घेतली असावी. आता पक्षश्रेष्ठी फडणवीसांचा हा निर्णय मान्य करतील का, हे पाहावे लागेल. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्याऐवजी सरकारमध्ये भाजपमधील कोणत्या नेत्याची निवड होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयामुळे महायुतीमधील ब्लेम गेम थांबणार?


लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु होती, त्यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही एका पेजवर असल्याचे दिसत नव्हते. त्यावेळी दोघांमध्ये काही समन्वय नसल्याची चर्चा झाली होती. पण मुख्यमंत्री आणि उपमु्ख्यमंत्र्यांनी वारंवार आपल्यात समन्वय असल्याचे सांगितले होते. पण आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच शिंदे गटाचे नेते वारंवार म्हणत आहेत की, भाजपकडून आमच्या मतदारसंघातील नेगेटिव्ह सर्व्हे दाखवण्यात आले. हे सर्व्हे दाखवून उशीरा जागावाटप करण्यात आले. त्यामुळे आमच्या उमेदवारांचा पराभव झाला, असे शिंदे गटाचे नेते म्हणत आहेत. त्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हा सगळा ब्लेम गेम थांबवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सगळी जबाबदारी स्वत:च्या डोक्यावरच घेतली. मला सरकारमधून मुक्त करा मी पक्षाचं काम करतो, असे दाखवून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर खापर फोडण्याचा होणारा प्रयत्न हाणून पाडला आहे. 


संजय राऊत यांनीही फडणवीसांवर टीका करताना, ते स्वत:ला मोठे नेते समजायचे, 45 पार जागा आणण्याची भाषा करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे लोकसभेचा निकाल हा फडणवीसांचा पराभव असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. मात्र, फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त करुन या टीकेचे मूळच नष्ट केले आहे. निवडणुकीत मी कमी पडलो, मी आता जोमाने काम करेन, अशी भूमिका घेऊन फडणवीस यांनी त्यांच्यावर आणखी टीका होणार नाही, याची तजवीज केल्याचे सांगितले जाते.


आणखी वाचा


खचलेल्या कार्यकर्त्यांना धीर दिला, प्रदेशाध्यक्षांची पाठराखण केली अन् उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची भाषा; देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेने खळबळ