Suresh Gopi BJP Kerala :  मल्याळम अभिनेते सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी अनेक वर्षानंतर केरळमध्ये (Kerala) भाजपच्या (BJP) विजयाचा दुष्काळ संपवत कमळ फुलवले आहे. त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश गोपी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय संपादन केला. सुरेश गोपी यांनी मागील अनेक वर्षांपासून त्रिशूरमध्ये सक्रिय आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 


केरळमध्ये भाजपचा प्रवेश...


केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चांगलाच सक्रिय आहे. तरीदेखील भाजपला मोठं राजकीय यश मिळवण्यास अपयश येत होते. अभिनेता सुरेश गोपींनी  भाजपचा राजकीय दुष्काळ संपवला. सुरेश गोपी आणि भाजपच्या पहिल्या विजयामागे अनेक कारणे दडलेली आहेत. सुरेश गोपी हे मल्याळम चित्रपटांमधील लोकप्रिय चेहरा आहे. त्यांना महिला मतदारांचा आणि ख्रिश्चन समाजातील एका वर्गाचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचा समन्वयही चांगला आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत केरळमध्ये भाजपने आपली संघटनाही बळकट केली आहे. त्याचा फायदा सुरेश गोपी यांना झाला.


250 हून अधिक मल्याळम चित्रपटात काम...


अभिनेता सुरेश गोपी यांनी 250 हून अधिक मल्याळम चित्रपटात काम केले आहे. अॅक्शन चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेसाठी ते ओळखले जातात.


2016 मध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून भाजपमध्ये प्रवेश केला.  2019 मध्ये जेव्हा त्यांनी निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी प्रथम त्रिशूरमध्ये आपली छाप पाडली. मात्र, त्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचा व्होटर शेअर वाढवण्यास यशस्वी झाले.  दोन वर्षांनंतर, 2021 मध्ये, त्यांनी त्रिशूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली, परंतु पुन्हा तिसरे स्थान मिळवले. मात्र, एलडीएफ आणि यूडीएफला चुरशीची लढत देण्यात आली. 


विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही ते भाजपचे काम करत राहिले. भाजपतर्फे चालवल्या जाणाऱ्या आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले. करुवन्नोर सहकारी बँक फसवणूक प्रकरणी भाजपने पुकारलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या घोटाळ्यात राजकीय नेत्यांविरोधात आरोप होते. 


मशिदीतही गेले सुरेश गोपी...


भाजप हा हार्डकोअर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. केरळमध्ये भाजपकडे याच दृष्टीने पाहिले जाते. मात्र, सुरेश गोपी यांनी आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. धर्मनिरपेक्ष व्यक्ती म्हणून त्यांनी आपली प्रतिमा बिंबवण्याचा प्रयत्न केला.  प्रचाराच्या दरम्यान सुरेश गोपी यांनी मंदिरांव्यतिरिक्त चर्च आणि मशिदींनाही भेटी दिल्या. मला पाठिंबा देणाऱ्या "धर्मनिरपेक्ष" मतदारांना मी "सॅल्यूट" करतो, असे गोपी यांनी निवडणूक विजयानंतर म्हटले. 


सुरेश गोपी यांनी म्हटले की, "या धर्मनिरपेक्ष मतदारांनी जातीच्या किंवा राजकीय संलग्नतेच्या दृष्टीकोनातून पाहिलेले नाही. धर्मनिरपेक्ष मतदारांची दिशाभूल करण्याचे अनेक स्तरांतील लोकांकडून अनेक प्रयत्न केले गेले. त्यांनी मला निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी माझ्या आत्म्याला दुखावले आहे. देवाला  मला विजयरुपी बक्षीस दिले असल्याचे गोपी यांनी म्हटले. 


सुरेश गोपी यांना किती मते मिळाली?


भाजपच्या सुरेश गोपी यांना एकूण 4,12,338 मते मिळाली तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सुनील कुमार यांना 3,37,652 मते मिळाली. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार के. मुरलीधरन 3,28,124 मतांसह तिसऱ्या स्थानावर राहिले. या निवडणुकीत भाजपला 37.8 टक्के मिळाली, तर LDF आणि UDF यांना 30.95 टक्के आणि 30.08 टक्के मते मिळाली.