Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप (AAP), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) अशी तिरंगी लढत झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सध्याच्या कलानुसार भाजप 70 जागांपैकी 43 जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पार्टी 26 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस एक जागेवर आघाडीवर आहे. यामुळे आप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आप आणि काँग्रेसला डिवचले आहे.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली. काँग्रेस आणि आपने दिल्लीच्या 70 जागांवर एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केले. यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. हाच धागा पकडत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
ओमर अब्दुल्ला यांचा आप आणि काँग्रेसवर हल्लाबोल
दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये सध्या 'आप' पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस केवळ एकच जागेवर आघाडीवर आहे. यावरून ओमर अब्दुल्ला यांनी 'एक्स'वर पोस्ट करत मोठं वक्तव्य केलंय. आपापसात आणखी लढा आणि एकमेकांना संपवा, असे म्हणत त्यांनी आप आणि काँग्रेसने दिल्लीच्या निवडणुकीत एकत्र न लढण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे.
बसपाच्या उमेदवाराचा 'आप'ला पाठिंबा
दरम्यान, दिल्लीत मतमोजणी सुरु असतानाच बसपा उमेदवाराने आपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. घोंडा विधानसभा मतदारसंघाचे बसपाचे उमेदवार सुंदर लोहिया यांनी आम आदमी पार्टीचे उमेदवार गौरव शर्मा यांना पाठिंबा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांवर चालणारा पक्ष असेल तर तो आम आदमी पक्ष असल्याचे सुंदर लोहिया यांनी म्हटले आहे. यामुळे दिल्लीत मतमोजणी सुरु असतानाच मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या