शिवसेनेच्या गडात राष्ट्रवादीने शिरकाव करत फडकवलेला झेंडा म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली आणि खेड या तीन उत्तरेकडच्या तालुक्यांचा मिळून दापोली विधानसभा मतदारसंघ तयार होतो. 2009 पूर्वी या मतदारसंघात फक्त मंडणगड आणि दापोली हे तालुके यायचे मात्र 2009 च्या मतदारसंघ फेररचनेत रामदास कदमांचं संस्थान खालसा झालं. खेड मतदारसंघाचं विभाजन झालं आणि त्याचा निम्मा भाग गुहागर आणि निम्मा दापोली मतदारसंघाला जोडण्यात आला. आणि तेव्हापासून इथे शिवसेना डळमळीत होताना दिसली.
खरंतर 1990 पासून दापोली मतदारसंघ शिवसेनेकडे होता. किंबहुना दापोली मतदारसंघ म्हणजे शिवसेना असं समीकरणच झालं होतं. काँग्रेस नेते भाई जगताप यांनाही या मतदारसंघानं पराभव दाखवला आहे. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांना या मतदारसंघानं 1990 पासून विधानसभेत पाठवलं. शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या मतदारसंघाला 2014 मध्ये मात्र खिंडार पडलं. खेड मतदारसंघाचं झालेलं विभाजन हे एक कारण आहेच मात्र अँटी इन्कम्बन्सीचा फटकाही शिवसेनेला बसला आणि शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना धूळ चारत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम इथे निवडून आले. दळवींच्या पराभवाला रामदास कदम यांची नाराजीही काही प्रमाणात कारणीभूत असल्याची अशी चर्चा होती, कारण खेडचं विभाजन झाल्यानंतर रामदास कदम यांना दापोलीची जागा लढवायची होती मात्र मातोश्रीवरून आलेल्या आदेशामुळे त्यांना गुहागरची जागा लढवावी लागली आणि तिथे त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये दापोली आणि गुहागर हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून गेले.
सूर्यकांत दळवी यांना दापोलीत झालेला पराभव जिव्हारी लागला हे नक्की मात्र पराभवानंतर दळवी त्याचं खापर संघटनेवर आणि पक्षनेत्यावर फोडत राहिले आणि स्वतःची कार्यशैली कशी योग्य याची वकीली करत राहण्यातच त्यांनी धन्यता मानली. मात्र सलग पाच टर्म निवडून आल्यानंतरही पराभव दिल्याचा अभ्यास आणि कारणमीमांसा, मतदारसंघातली पकड, संघटना बळकटीकरण याकडे मात्र दळवी यांनी दुर्लक्ष केलं. मात्र रामदास कदम यांचं अस्तित्व या भागात चांगलंच दिसून आलं. सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम दिसायला एका पक्षातले मावळे असले तरी दोघांमधून विस्तव जात नाही हे शिवसैनिकांना माहित आहे. परंतू 2014 च्या पराभवानंतरही रामदास कदमांनी पुन्हा या भागात काम सुरू केलं.
आमदार म्हणून संजय कदम यांनीही मतदारसंघात आपलं अस्तित्व दिसेल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागात संपर्क वाढवणे, तरुणांमध्ये संघटना विस्तारणे, अधिवेशनात मतदारसंघाचे प्रश्न मांडणे त्यांनी ताकदीनं केलंय. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात मागील निवडणुकीतल्या पराभवानंतरही शिवसेनेचा वरचष्मा अजूनही दिसून येतोय. संजय कदम यासारख्या राष्ट्रवादीच्या तरुण शिलेदारासमोर तरुण कार्यकर्ताच हवा म्हणन रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना मैदानात उतरण्याचे आदेश मातोश्रीवरून आले आणि त्यांनी मरगळलेल्या शिवसैनिकांत नवी जान फुंकायला सुरवात केलेआहेत. गेल्या वर्षभरात योगेश कदम यांचं काम प्रकर्षानं दिसून आलंय.
मध्यंतरीच्या काळात दापोली मतदारसंघातून रामदास कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा होती. त्यामुळे सूर्यकांत दळवी यांची उघड नाराजी शिवसैनिकांनी पाहिलेली होती. मात्र शिवसेनेच्याच जेष्ठ नेत्यांकडून भर कार्यकर्ता मेळाव्यात झालेल्या टीकेमुळे मातोश्रीवरचं वजन कमी होत असल्याचं सूर्यकातं दळवी यांना उमगलेलं आहे. त्यातच आता रामदास कदम यांच्याऐवजी योगेश कदम यांनी मोर्चा सांभाळल्यानंतर सूर्यकांत दळवी याचं संस्थान खालसा झाल्यातच जमा आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेनी दापोलीतून निवडणूक लढवावी असं अजब पत्रक काढून सूर्यकांत दळवी यांनी गुगली टाकायचा प्रयत्न केला. अत्यंत संयमी प्रतिक्रीया देत योगेश कदम यांनी त्यातील हवाही काढून टाकलीय.
2014 च्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष निवडणूक वेगवेगळे लढले होते. त्यावेळी दापोलीतील लढत मुख्यत्वे सूर्यकांत दळवी विरुद्ध संजय कदम अशीच झाली होती आणि अवघ्या साडेतीन हजाराच्या मताधिक्यानं संजय कदम यांचा निसटता विजय झाला होता. मात्र त्यानंतर शिवसेनेनं इथं चांगलाच जम बसवलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती झाली किंवा नाही झाली तरी इथे शिवसेनेचं पारडं जड असणार हे नक्की. राहिला प्रश्न संजय कदम यांचा तर राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यांना इथे इतर कोणताही प्रबळ उमेदवार देता येणार नाही त्यामुळे आघाडी अथवा बिघाडी इथे विरोधकांचा झेंडा पुन्हा एकदा संजय कदम यांच्याच खांद्यावर असायची दाट शक्यता आहे.
योगेश कदम आणि संजय कदम दोघेही तरुण, तडफदार आहेत, ज्या कुणबी समाजाचं दापोली मतदार संघात प्राबल्य आहे त्याच समाजातले आहेत. दोघांचं ही मतदारसंघातलं काम चांगलं आहे. आणि सद्यस्थितीत दोघांनाही कोणताच पर्याय जवळपास दिसत नाही. त्यामुळे दापोली मतदार संघातली लढत ही कदम विरुद्ध कदम अशीच असणार हे स्पष्ट आहे. आता यात शिवसेनेचं सध्या जड असलेलं पारडं त्यांना विजय मिळवून देणार की संजय कदम अखेरच्या टप्प्यात करीश्मा दाखवून आपली जागा राखणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल