चेन्नई : तामिळनाडूतल्या विरुद्धुनगर जिल्ह्यात शनिवारी (06 एप्रिल) रात्री काँग्रेसतर्फे एका प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खूप कमी लोक हजर होते. सभेच्या ठिकाणी आयोजकांनी ठेवलेल्या खुर्च्या रिकाम्याच होत्या, हे पाहून एक छायाचित्रकार रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढत होता. हे पाहून संतापलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्या छायाचित्रकाराला जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

तामिळनाडू काँग्रेसचे अध्यक्ष के. एस. अलागिरी यांची विरुद्धुनगरमध्ये सभा होती. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, अशी अपेक्षा ठेवून आयोजकांनी मोठ्या प्रमाणात खुर्च्या पटांगणात मांडल्या होत्या. परंतु या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली होती. सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळत होत्या. त्याचवेळी एका तमिळ साप्ताहिकामध्ये कार्यरत असलेले छायाचित्रकार आर. एम. मुथुराज या सभेचे वृत्तांकन करण्यासाठी तिथे दाखल झाले होते. सभेला लोकांचा अल्प प्रतिसाद आणि रिकाम्या खुर्च्या पाहून त्यांनी त्याचे फोटो काढणे सुरु केले. हे पाहताच तिथे उपस्थित असणारे काँग्रेस कार्यकर्ते मुथुराज यांच्यावर भडकले आणि त्यांनी मुथुराज यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुथुराज यांनी कॅमेरा दिला नाही, म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुथुराज यांच्यावर हल्ला केला.

व्हिडीओ पाहा


दरम्यान, तिथे उपस्थित असलेल्या इतर पत्रकार काँग्रेस कार्यकर्ते मारहाण करत असलेल्या मुथुराज यांना सोडवण्याचा प्रयत्न करत होते. तर काही लोकांनी त्याचा व्हिडीओ शुट केला. हाच व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जबर मारहाणीनंतर मुथुराज यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.