कल्याण :  लोकलमध्ये चढताना झालेल्या वादातून पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.


तानाजी येरुलवाड असं मारहाण झालेल्या पोलिसाचं नाव आहे. ते मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. शुक्रवारी ते कामावरून बदलापूरला घरी परतत होते. यावेळी कल्याण स्थानकातून त्यांनी बदलापूर लोकल पकडण्याचा प्रयत्न केला.

मात्र गर्दीत काही जणांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावरुन झालेल्या वादानंतर चार प्रवाशांनी त्यांना लोकलच्या डब्यात घुसून मारहाण केली. या मारहाणीत येरुलवाड यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यादरम्यान येरुलवाड यांनी आपण पोलीस असल्याचं सांगत ओळखपत्रही दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र मारहाण करणाऱ्या प्रवाशांनी त्यांचं ओळखपत्र आणि मोबाईल हिसकावत फेकून दिला.

अनिकेत जैस्वाल, प्रशांत राजे आणि अन्य दोन अल्पवयीन आरोपींना या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चौघे पळून जात असताना त्यांना इतर प्रवाशांनी पकडलं आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात नेलं.  या चौघांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन वगळता दोघांना अटक केली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळीच एका प्रवाशाला तोतया पोलिसाने मारहाण केल्याचीही घटना घडली होती. त्यामुळं या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गर्दीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी प्रवाशांमधून केली जातेय. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी काहीही बोलायला नकार दिला आहे.