Bhandara ZP Results : भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला दणका देत सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. भंडारा जिल्हा परिषदेच्या 52 जागांपैकी काँग्रेसला 21 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 13 जागा, भाजपला 12 जागा, शिवसेनेला 1, बसपा 1, वंचित 1 तर तीन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा परिषदेत पुन्हा काँग्रेसच सत्ता स्थापन करणार आहे. 


भंडारा जिल्ह्यात दोन नगर पंचायतींमध्ये भाजपने बाजी मारली आहे. यामध्ये मोहाडी नगर पंचायत आणि लाखांदूर नगर पंचायतचा समावेश आहे. मात्र लाखनी नगर पंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारत आपला गड कायम राखला आहे. 


या निवडणुकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि परीनय फुके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असले तरी घरच्या मैदानावर नाना पटोले यांना मोठा धक्का बसला आहे. कारण भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांचा पराभाव झाला आहे. विद्यमान अध्यक्ष रमेश डोंगरे यांचा पराभव झाला  असला तरी हा नाना पटोले यांनाच धक्का असल्याचं मानलं जात आहे. 


राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार काल मतदान झाले. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले.


महत्वाच्या बातम्या