Solapur District Assembly Constituency : पश्चिम महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची धुळदाण झाली. मात्र, सोलापूर जिल्ह्याने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली आहे. जिल्ह्यात लढवलेल्या सहापैकी चार जागा पटकावण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं. मात्र, काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पाच महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी नेमकं मिळवलं तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसने तीन जागा लढवल्या, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिंदे कुटुंबाचा सोलापूर मध्य मतदारसंघ बालेकिल्ला समजला जातो. त्याच सोलापूर मध्य मतदारसंघामध्ये उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाली आहे. सोलापूर दक्षिणमध्ये सुद्धा ज्या अपक्षाला पाठिंबा दिला त्याचं सुद्धा डिपॉझिट जप्त झालं. पंढरपूरमधून सुद्धा भगीरथ बालके पराभूत झाले आहेत. शरद पवार गटाच्या अनिल सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका भालकेंना बसला. जितक्या मतांनी भगीरथ भालके पराभूत झाले तेवढीचे मते अनिल सावंत यांनी मिळवली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कुरघोडींमध्ये या जागा पडल्या आहेत.
चेतन नरोटे डिपॉझिट देखील वाचू शकले नाहीत
सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2009 सालीपासून या मतदारसंघात प्रणिती शिंदे या सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्या. माकपचे दिग्गज नेते नरसय्या आडम यांचा प्रणिती शिंदे यांनी सलग पराभव केला होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांचा विजय झाल्याने सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, मागील दोन निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एमआयएम हा देखील मोठा पक्ष या मतदारसंघांमध्ये होता. शिवसेनेची पारंपारिक जागा असलेल्या सोलापूर मध्य जागा भाजपने लढवण्याचा निर्णय घेतला नव्हता. देवेंद्र कोठे या तरुण उमेदवाराला भाजपने या मतदारसंघातून संधी दिली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात झालेल्या धार्मिक धुव्रीवकरणावरून निवडणूक भाजप आणि एमआयएममध्येच होणार हे स्पष्ट झाले होते. अपेक्षेप्रमाणे भाजप आणि एमआयएममध्ये ही निवडणूक झाली. मात्र, काँग्रेसचा या मतदारसंघात दारुण पराभव झाला. प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघांमध्ये मोठी ताकद लावलेली असताना देखील काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे हे आपले डिपॉझिट देखील वाचू शकले नाही.
नरसय्या आडम सलग चौथ्यांदा पराभूत
तर दुसरीकडे माजी आमदार नरसय्या आडम हे देखील सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. या निवडणुकीमध्ये ते आडम मास्तर देखील आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ जिथून सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. त्या मतदारसंघात देखील काँग्रेसने ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार म्हणजे धर्मराज काडादी देखील आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. ठाकरे गटाकडून या मतदारसंघात अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसकडून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र ऐनवेळेस काँग्रेसने दिलीप माने यांना एबी फॉर्म दिला नाही. एबी फॉर्म मिळाला नसला तरी दिलीप माने आणि काँग्रेसचे नेते धर्मराज काडादी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी प्रणिती स्वतः उपस्थित असताना दिलीप माने यांनी अर्ज माघारी घेतला होता. धर्मराज काडादी यांनी मात्र अपक्ष अर्ज कायम ठेवला. ऐन मतदानाच्या दिवशी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण झाला. निकालानंतर सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केलेल्या धर्मराज काडादी यांचं डिपॉजिट देखील जप्त झालं. ठाकरे गटाच्या अमर पाटील यांचा दारुण पराभव झाला.
तर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीमधील मैत्रीपूर्ण लढतीमुळे भाजपचा विजय सुकर झाल्याचा दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात झालेल्या मत विभाजनामुळे भाजपचे समाधान आवताडे यांचा पंढरपूरमध्ये विजय झाला.
इतर महत्वाच्या बातम्या