Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस पक्षाने नागपूरचे जिल्हाध्यक्ष आणि रामटेक मतदारसंघातील (Ramtek Constituency) बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक (Rajendra Mulak) यांची हकालपट्टी फक्त शिवसेना ठाकरे गटाला भुलवण्यासाठी केली आहे का? काँग्रेस विदर्भात शिवसेना ठाकरे गटासोबत (Shiv Sena Uddhav Thackeray Group) दगाबाजी करत आहे का? असे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे एका बाजूला राजेंद्र मुळक यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि ठाकरे गटाचे विशाल बरबटे यांच्या विरोधात उघड बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांची हकालपट्टी तर केली. मात्र तरीही काल सकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र मुळक यांच्या प्रचारासाठी नागपूर जिल्ह्यातील चाचेर गावामध्ये उपस्थित होते.
तर रात्र होता होता तेच राजेंद्र मुळक शेजारच्या उमरेड मतदार संघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संजय मेश्राम यांच्या प्रचारासाठी उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते हकालपट्टी झालेल्या बंडखोर उमेदवारांच्या मंचावर जात नाही आहे. तर राजेंद्र मुळक ही बिनधास्तपणे काँग्रेसच्या मंचावर ये जा करत आहे. त्यामुळे काँग्रेस विदर्भात शिवसेना ठाकरे गटासोबत दगाबाजी करत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विदर्भात काँग्रेसची शिवसेना ठाकरे गटासोबत दगाबाजी?
राजेंद्र मुळक यांनी काल(सोमवार) नागपूर जिल्ह्यातील उमरेड मतदारसंघात मांढळ या गावी उमरेड मतदार संघातील काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या प्रचार सभेत राजेंद्र मुळक यांनी काँग्रेससाठी मत तर मागितलेच. सोबतच त्यांनी संजय मेश्राम यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून माझे पूर्ण नियंत्रण असेल. त्यांना विधानसभेत मी माझ्या बाजूलाच बसवेल आणि काय प्रश्न विचारायचे काय नाही हे शिकवेन, असं वक्तव्यही केलं. एवढेच नाही तर राजेंद्र मुळक माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी माझे त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण आहे आणि त्यामुळे मला त्यांचे कान पकडण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य ही राजेंद्र मुळक यांनी बोलताना व्यक्त केलं. त्यामुळे काँग्रेस पक्षातून आणि जिल्हाध्यक्षपदावरून राजेंद्र मुळक यांची हकालपट्टी फक्त देखावा होती का, ती शिवसेना ठाकरे गटाला भुलवण्यासाठी होती का असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात?
नुकतेच रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागताना दिसले. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात झाली आहे का? असे चित्र या प्रचार सभेमुळे दिसून येत आहे.
हे ही वाचा