नागपूर: उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. या पत्रावरुन विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) आक्रमक भूमिका घेतली आहे. उलेमा बोर्डाने (Ulema board) मविआला पाठवलेल्या पत्राबाबत विहिंपने (VHP) काँग्रेस पक्षाबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. या पत्रात उलेमा बोर्डाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालावी, अशी मागणी मविआकडे (Mahavikas Aghadi) केली आहे. यावर विहिंपने म्हटले आहे की,  संघावर बंदी लादणे ही स्वप्नवत (स्वप्नाची) गोष्ट, तशी प्रत्यक्ष कृती शक्य नाही. कोणी संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये. भूमाफिया वक्फ बोर्डाला निधीची काय गरज, असा सवाल विहिंपकडून उपस्थित करण्यात आला. तसेच पोलीस दलात मुस्लिम तरुणांना प्राधान्य द्यावे, या उलेमा बोर्डाच्या मागणीचाही विहिंपकडून तीव्र विरोध करण्यात आला.  


संघावर बंदी लादणे ही स्वप्नवत (स्वप्नाची) गोष्ट आहे, त्याची प्रत्यक्ष कृती आता होऊ शकत नाही. संघावर बंदी लादण्याचे स्वप्न नेहरू पासून अनेकांनी पाहिले.. तसे प्रयत्न इंदिरा गांधींनी ही केले.. संघ मात्र, आता त्या प्रयत्नापेक्षा मोठा झाला आहे. त्यामुळे कोणी ही संघावर बंदी लादण्याची स्वप्ने पाहू नये असे मत विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केले. ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे 17 वेगवेगळ्या मागण्या करत संघावर बंदी लागण्याची ही मागणी केली होती.. त्या संदर्भात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांतमंत्री गोविंद शेंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


हिंदू समाज तुम्हाला सोडणार नाही, विहिंपचा मविआला इशारा


वक्फ बोर्ड देशातील सर्वात मोठा भूमाफिया असून अशा भूमाफिया संघटनेला 1 हजार कोटी रुपयांचा निधी अनुदानामध्ये देण्याची उलेमा बोर्डाने मागणी करणे चूक आहे. उलेमा बोर्डाने अशी मागणी करणेच मुळात खूप मोठे धाडस असून आता इतर धर्मियांनी त्याचा विचार करण्याची वेळ आली आहे असे गोविंद शेंडे म्हणाले.


2012 ते 2024 दरम्यान राज्यातील विविध दंगलींमध्ये आरोपी बनवण्यात आलेल्या मुस्लिम धर्मीय आरोपींची कायदेशीर प्रक्रियेतून सुटका करावी अशी मागणी ही उलेमा बोर्डाने महाविकास आघाडीकडे केली होती. त्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेने अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही दंगल कराल, संपत्तीची जाळपोळ कराल, सरकारची संपत्ती नष्ट कराल आणि हे केल्यानंतर कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास, कारवाई झाल्यास ती कायदेशीर कारवाई मागे घेण्याची मागणी करणे अत्यंत चुकीचे असल्याचे विहिपचे म्हणणे आहे. 


देशात कायदा, न्यायालय काही शिल्लक राहिला आहे की नाही? कोणी चुकीचे काम करणार असेल, तर त्याचे परिणाम तर भोगावेच लागणार. त्यामुळे उलेमा बोर्डाच्या चुकीच्या मागण्यांबद्दल नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी विचार करण्याचे आश्वासन देणे अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे विहिंपचे म्हणणे आहे. काही मतांसाठी मुस्लिमांची किती चापलुसी करणार. हिंदू समाज आता तुम्हाला सोडणार नाही असे गोविंद शेंडे म्हणाले.


पोलीस भरतीमध्ये मुस्लिमांच्या भरतीला विहिंपचा विरोध


मुस्लिम तरुणांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य द्या, या उलेमा बोर्डाच्या मागणीचाही विहिंप ने कडाडून विरोध केला आहे. धार्मिक आधारावर देशात कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आधीच स्पष्ट केले आहे. असे असताना महाविकास आघाडीचे नेते आरक्षणाची मर्यादा 50% च्या वर नेण्याची जी भाषा करत आहे, त्यामागे महाविकास आघाडीच्या मनात मुस्लिमांना आरक्षण देण्याची योजना तर नाही अशी शंका आम्हाला असल्याचेही शेंडे म्हणाले.


नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एक तर उलेमा बोर्डाने केलेल्या मागण्यांचा उघड समर्थन करावे. अन्यथा धाडस करून उलेमा बोर्डाच्या चुकीच्या मागण्या पूर्णपणे फेटाळून लावाव्या आणि प्रचार सभांच्या माध्यमातून ते जाहीर करून हिंदू समाजाला आश्वस्त करावे, अशी मागणी ही विश्व हिंदू परिषदेने केली आहे.


आणखी वाचा


हिंदुत्ववादी पंतप्रधान शिवाजी पार्कवर येताय अन्...; राज ठाकरे आक्रमक, उद्धव ठाकरे, राहुल गांधींवरही हल्लाबोल