Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेसनं बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत एकूण 28 काँग्रेस बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सूचनेवरून पक्षानं बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. यात रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक (Rajendra Mulak), काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार (Yajnavalkya Jichkar), पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल (Aaba Bagul) आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे (Kamal Vyavhare) यांना 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, असे असले तरी काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार (Sunil Kedar) आणि रामटेकचे खासदार श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ऐवजी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारासाठी मत मागताना दिसत आहेत. त्यामुळे मविआत आधीच रामटेकच्या जागेवरून घमासान झाले असताना रामटेक मतदारसंघात माविआत बिघाडी झालीय का? असा सवाल या निमित्याने विचारला जाऊ लागला आहे.
रामटेक मतदारसंघात माविआत बिघाडी?
रामटेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसने जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पक्षातून हकालपट्टी केली खरी, मात्र तरीही काँग्रेसचे नेते पूर्ण शक्तीने बंडखोर उमेदवाराचा प्रचार करत महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मत मागत असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या विरोधात?
आज सकाळी रामटेक विधानसभा मतदारसंघातील चाचेर गावात बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार, रामटेक मतदारसंघाचे खासदार श्याम बर्वे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे हे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांच्यासाठी मत मागताना दिसले. त्यामुळे रामटेक मतदारसंघात काँग्रेस पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात झाली आहे का? असे चित्र या प्रचार सभेमुळे दिसून येत आहे.
हे ही वाचा