दरम्यान, सांगली लोकसभेची जागा अन्य पक्षांसाठी सोडली जाण्याच्या चर्चेने अस्वस्थ झालेल्या स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी थेट पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांना साकडे घातले आहे. सांगलीची जागा अन्य कोणालाही देऊ नये, अशी गळ त्यांनी खर्गेंना घातली आहे. यावर पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे आहे. परंतु या निवडणुकीत सांगलीची जागा ही अन्य पक्षाला देण्याची तयारी काँग्रेस पक्षश्रेष्टींकडून सुरू आहे. त्यामुळे सांगलीतले काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावन्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी याचा निषेध केला आहे.
पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात सांगलीत काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून काँग्रेस हाय कमांडचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे. यावेळी घोषणाबाजी करत काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीसमोर घोषणाबाजी केली. सांगलीच्या जागेवर कॉंग्रेसचाच अधिकार असल्याच्या यावेळी घोषणा देण्यात आल्या. हाय कमांडने आपला निर्णय बदलावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सांगलीची जागा इतर कोणत्याही पक्षाला देणे हा वसंतदादा पाटील यांचे घराणे संपवण्याचा कुटील डाव असल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.