मुंबई : शरद पवारांनी पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. बालकांनी काहीही विधानं केली तर ज्येष्ठांनी त्याकडे लक्ष देऊ नये, असा टोला  शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. आज शरद पवार यांनी मुंबई येथील विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर देशातील महत्त्वाच्या काही मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, फडणवीस हे बालबुद्धीला शोभेल अशी विधानं करत आहेत. मी त्यांच्या पक्षातील नेत्यांविरोधात निवडणूक लढवल्या आहेत. त्यावेळी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे, हा त्यांना कदाचित माहिती नसेल, असे ते म्हणाले.

मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करा : शरद पवार
मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी शरद पवार यांनी यावेळी केली. मुंबईतील या पुलाचे ऑडीट झाले होते. त्याचीच चौकशी करण्याची मागणी पवार यांनी यावेळी केली. मध्य रेल्वेने 11 नोव्हेंबर 2015 ला राज्यसरकारला पत्र दिलं होतं. या पत्रात मुंबईतील ओव्हरब्रिजच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हे पत्र शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. या पत्रानंतरही सरकारने किंवा महानगरपालिकेने गांभीर्याने घेतले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मुंबईत काल अपघात झाला तो अत्यंत चिंतेचा विषय आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत विरार ते चर्चगेट, कर्जत ते सीएसटी रोज 1 कोटी लोक प्रवास करतात. या मार्गावर अनेक लोकांचे विविध कारणाने अपघात होतात. दिवसाला 15 ते 20 अपघात होतात. वर्षाला 3 हजार लोकांचा मृत्यु होतो. महिन्याला 2-3 हजार प्रवासी जखमी होतात. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बदल करण्याची गरज आहे. पहिल्यांदा रेल्वे स्टेशनची सुधारणा करणे गरजेचे आहे. असे शरद पवार म्हणाले.

दिवसेंदिवस रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे सांगतानाच बुलेट ट्रेनपेक्षा मुंबईतील रेल्वे पुल आणि मुंबई लोकलची अवस्था सुधारावी अशी मागणी केली.

आता बुलेट ट्रेन होणार आहे. यावर सव्वा लाख कोटी खर्च होणार आहे. आमचे सर्वांचे मत आहे की, सरकारने तो पैसा मुंबई लोकल आणि इतर रेल्वे सर्कलवर खर्च करावा अशी मागणीही केली. याशिवाय मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते कोलकाता, कोलकाता ते चेन्नई, चेन्नई ते मुंबई या मार्गाचे जाळे सक्षम करावे असेही  पवार म्हणाले.