नवी दिल्ली : काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या आयोध्या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, "जो काँग्रेस पक्ष रामाचं अस्तित्व मानत नाही, त्या काँग्रेसचे नेते आता रामभक्त बनून फिरु लागले आहेत." इराणी यांनी प्रियांका गांधी यांचं नाव न घेता, त्यांचावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभेत इराणी बोलत होत्या.


इराणी म्हणाल्या की, "काँग्रेसच्या नव्या पिढीला पूर्वी परदेश फिरण्यामधून वेळ मिळत नव्हता, आता तीच नवी पिढी गंगा दर्शन करत आहे. यांचा पक्ष रामाचं अस्तित्व मानत नाही. परंतु आता त्यांचे नेते राम भक्त बनून फिरत आहेत. पूर्वी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या काँग्रेसचे लोक आता जानवं घालून फिरु लागले आहेत."

इराणी म्हणाल्या की, "काँग्रेसने आता पातळी सोडली आहे. त्यांचे नेते शहीद जवानांचा अपमान करत आहे. काँग्रेस आणि महाभेसळ असलेल्या पक्षांच्या नेत्यांचा मी धिक्कार करते. देशाचा अपमान करुन शत्रू राष्ट्राला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या या राजकारणाचा मी निषेध करते."