मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातील तसेच देशभरातील नेतेमंडळी त्यांना अभिवादन करत आहेत. महाराष्ट्रातीलही अनेक नेत्यांनी मुंबईतील शिवाजी पार मैदानातील समाधीस्थळी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनीदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. काँग्रेस हा पक्ष लोकशाही, समाजवादी विचारसणीचा पुरस्करता आहे. तर हिंदुत्त्वाचा मुद्दा घेऊन शिवसेना या पक्षाचा विस्तार, वाढ झालेली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष वैचारिकदृष्ट्या वेगळे आहेत, असं राजकीय जाणकार सांगतात. सध्या मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. सध्याच्या विधानसभा निवडणुकीला हे दोन्ही पक्ष एकत्र मिळूनच सामोरे जात आहे. हाच धागा पकडून बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या विधानांचा आधार घेत भाजपा आणि शिंदे गट उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. काँग्रेसचे लोक बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत नाहीत, असाही दावा विरोधक करतात. असे असताना आता राहुल गांधी यांनी एक्स या समाजमाध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. सोबतच त्यांनी मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच शिवसेना परिवारासोबत आहे, अशा भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत.
मोदींनी केली होती टीका?
काँग्रेसने आतापर्यंत कधीही बाळासाहेबांचे कौतुक केलेले नाही, असा दावा भाजपाकडून केला जातो. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील महाराष्ट्रातील प्रचारसभांत अनेक ठिकाणी याबाबत उल्लेख केला आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एका सभेला संबोधित करताना मोदी यांनी या टीकेचा पुनरुच्चार केला. "मुंबई हे आत्मसन्मानाचं शहर आहे. मात्र ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अवमानित केलं, त्यांच्याच हातात हे आत्मसन्मानाचं रिमोट कंट्रोल देण्यात आलंय. याच कारणामुळे काँग्रेसने बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करावी, असं मी आव्हान दिलं आहे. आजपर्यंत काँग्रेस तसेच काँग्रेसचे शहजादे (राहुल गांधी) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा गैरव केलेला नाही," असे मोदी म्हणाले होते.
दरम्यान, मोदी यांच्या या टीकेनंतर आता राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केलं आहे.
हेही वाचा :