मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे. बांदिवडेकरांचा 'सनातन संस्थे'शी संबंध असल्याचा आरोप झाल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या जागी आता काँग्रेसकडून आता रमेश किर यांचं नाव आघाडीवर आहे. विविध स्तरातून बांदिवडेकरांना विरोध होत असल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान वैभव राऊत भंडारी समाजासाठी कार्य करत होता. त्यामुळे वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा येथील स्थानिक नागरिकांनी रॅली काढली होती. वैभव राऊतचं भंडारी समाजासाठीचं काम पाहून मी त्या रॅलीत सहभागी झालो होतो. सनातन ही जातीयवाद संस्था आहे, मात्र मी सामाजिक कार्यकर्ता असल्याने कोणत्याही एका जातीसाठी करत नाही. माझा सनातन संस्थेशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण बांदिवडेकर यांनी दिलं आहे.
कोण आहेत रमेश किर?
- रमेश कीर यांनी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम पाहिलं आहे.
- कोकण म्हाडाचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यभार सांभाळण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
- किर हे पण भंडारी समाजातील नेते आहेत.
नवीनचंद्र बांदिवडेकरांना विरोध का?
'नालासोपारा बॉम्ब ब्लास्ट केसचा आरोपी असलेल्या वैभव राऊतला सोडवण्यासाठी नविनचंद्र बांदिवडेकरांनी मोर्चा काढला होता' असा आरोप केला जात आहे. बांदिवडेकर भंडारी समाजाचे नेते असून 'सनातन संस्थे'चे कोकण विश्वस्त आहेत, असा दावा केला जात आहे.
'हिंदुत्वाच्या रक्षणासाठी वैभव राऊत झटला' असं बांदिवडेकरांचं वक्तव्य 'दैनिक सनातन प्रभात'मध्ये छापून आल्याचं म्हटलं जात आहे. नविनचंद्र बांदिवडेकर यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी हात जोडून पक्षात बोलावलं आणि पक्षाने त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी दिल्याचा दावाही केला जात आहे.
नविनचंद्र बांदिवडेकरांचा 'सनातन'शी संबंध नाही
नविनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही. सनातनच्या कोणत्याही कार्यात त्यांचा सहभाग नाही. बांदिवडेकर सनातनची विचारधारा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात आहेत आणि हा विरोध पुढेही कायम राहील' असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करुन रत्नागिरीचा उमेदवार बदलण्याची मागणी मित्रपक्ष काँग्रेसकडे केली होती. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि राहुल गांधी यांना टॅग केलं होतं.