मुंबई : नाराज असलेले पुण्याचे खासदार संजय काकडे यांचं मन वळवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. त्यामुळे संजय काकडे यांची काँग्रेसवारी टळली आहे. संजय काकडे भाजपची साथ सोडून काँग्रेसच्या तिकीटावर पुणे लोकसभेची जागा लढवणार असल्याची चर्चा होती.


वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमध्ये आज प्रवीण छेडा आणि भारती पवार यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला संजय काकडेही उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री, सुभाष देशमुख संजय काकडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर त्यांच्या शिष्टाईला यश आलं. भाजपमधील पश्चिम महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपवून गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यामध्ये तह झाला आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.

संजय काकडे हे राज्यसभेचे खासदार आहेत. काकडे याआधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. अजित पवारांशी संजय काकडे यांचे मतभेद झाल्याने आणि राज्यसभा उमेदवारी न दिल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. यानंतर भाजपचे सहयोगी खासदार म्हणून त्यांची ओळख होती.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही संजय काकडे काँग्रेस प्रवेशावर ठाम

70 टक्के पुणेकरांची मला पसंती, भाजपच घरी येऊन लोकसभेचं तिकीट देईल : संजय काकडे