Eknath Shinde मुंबई महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 30 जून 2022 ला शपथ घेतली. विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं आज एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यावेळी त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, दीपक केसरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी अनेक निर्णय राज्यातील जनतेत लोकप्रिय ठरले.  एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत असे निर्णय सरकार आल्यानंतर लगेचच घेण्यात आले. त्यानंतर  आणलेली आनंदाचा शिधा योजना देखील लोकप्रिय ठरली. 


एक रुपयात पीक विमा योजना 


प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचा पीक विमा उतरवला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं शेतकऱ्यांना जे योगदान द्यावं लागायचं ते भरण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पीक विमा भरता आला. अनेक शेतकऱ्यांना योजनेचा फायदा झाला आहे.


महिलांना एसटी प्रवासात सवलत 


एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं महिलांना एसटी प्रवासात  50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीचं उत्पन्न वाढण्यात देखील झाला. 


नमो शेतकरी महासन्मान योजना 


पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना देखील सुरु करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. या योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. या रकमेत वाढ देखील करण्यात येणार आहे. 


आनंदाचा शिधा योजना 


राज्य सरकारनं आनंदाचा शिधा योजना आणून रेशनकार्ड धारकांना गणेशोत्सव, दिवाळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि इतर सणांचं निमित्त साधत 100 रुपयांमध्ये विविध वस्तू देण्याचा निर्णय घेतला. 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजना 


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील लोकप्रिय ठरली. या योजनेद्वारे राज्यातील अडीच कोटी महिलांच्या खात्यात आतापर्यंत प्रत्येकी साडेसात हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना देखील सुरु करण्यात आली. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेण्यात आली.


 मुख्यमंत्री मोफत बळीराजा वीज योजना 


या योजनेद्वारे शेतकऱ्यांचं साडे सात एचपी पर्यंतच्या कृषीपंपांच्या कनेक्शनसाठीचं  वीज बील माफ करण्यात आलं. थकित बिलाची रक्कम देखील माफ करण्यात आली. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला.


दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं विविध योजना राबवल्या, त्या योजनांच्या अंमलबजावणी आणि  प्रचारासाठी विशेष दक्षता घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्याचा निर्णय देखील एकनाथ शिंदेंनी घेतला. 


इतर बातम्या :