मुंबई : छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Result 2023) काँग्रेसचा (Congress) विजय झाला नसला तरी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना त्यांची जागा वाचवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पाटणमधून त्यांचे पुतणे आणि भाजप खासदार विजय बघेल (Vijay Baghel) यांचा 19723 मतांनी पराभव केला आहे. पाटणमध्ये विजय बघेल यांना 75715 मते मिळाली. तर मुख्यमंत्री बघेल यांना 95438  मते मिळाली आहेत.



भूपेश बघेल हे 2013 पासून पाटण मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. याआधी 2003 मध्येही त्यांनी येथून निवडणूक लढवली होती. त्याचवेळी, विजय बघेल हे सध्या भाजपचे दुर्गमधून लोकसभेचे खासदार आहेत. 2003 मध्ये त्यांनी भूपेश बघेल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता. मात्र, 2008 मध्ये त्यांनी विजय बघेल यांचा पराभव केला. 


सीएम बघेल यांनी निवडणूक जिंकली असली तरी काँग्रेसचा पराभव अनपेक्षित मानला जात आहे.  कारण काँग्रेस 2018 च्या विजयाची पुनरावृत्ती करणार नाही तर यावेळी 75 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा सातत्याने करत होती. मुख्यमंत्री बघेल यांनी तर भाजपला 15 जागाही जिंकता येणार नसल्याचा दावा केला होता, पण निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेसच्या छावणीला चकित केले आहे.


उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांना मोठा धक्का


छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पराभूत झाले आहेत आणि त्यापैकी सर्वात मोठं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव.  त्यांचा केवळ 94 मतांनी पराभव झाला. येथे राजेश अग्रवाल यांनी त्यांचा पराभव केला. यानंतर काँग्रेसने फेरमतमोजणीची मागणी केली. पुन्हा मतमोजणी झाली पण त्याचा निर्णय देखील काँग्रेसच्या विरोधात गेला. उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव यांच्याशिवाय काँग्रेसचे छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांचा देखील पराभव झाल आहे. 


छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 20 जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात 70 जागांसाठी मतदान घेण्यात आले. परंतु काँग्रेसचा पराभव करत छत्तीसगडमध्ये भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. 


छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार असल्याचं चित्र असताना भाजपने या राज्यात जोरदार मुसंडी मारली. भाजपने या राज्यात 56 जागा जिंकल्या असून काँग्रेसच्या वाट्याला 34 जागा आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आपला चेहरा बनवला होता, त्याचा फायदा पक्षाला झाल्याचं दिसून आलं. 


हेही वाचा :


Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड होता काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला, मग कुठे चूक झाली? ही पाच कारणं आहेत जबाबदार?