मुंबई : मध्य प्रदेशात भाजपनं गड राखला आणि एक्झिट पोलमध्ये दाखवणारा कल चुकीचा ठरवला. काँग्रेसचा पराभव मध्य प्रदेशात का झाला याची कारणमीमांसा करतानाच, भाजपच्या विजयाच्या कारणांवरही चर्चा व्हायला हवी. काँग्रेसनं मध्य प्रदेशात कमलनाथ यांनी आपल्याभोवती निवडणूक केंद्रीत केली होती. इंडिया आघाडीची होवू घातलेली बैठकही कमलनाथ यांनी होवू दिली नाही. शिवाय माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची काहीशी नाराजी मध्य प्रदेशात प्रचारादरम्यान दिसली. सॉफ्ट हिंदुत्वाचा नारा देण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी दिला होता. शिवाय राहुल गांधीची भारत जोडो यात्रेचा परिणाम मध्य प्रदेशात दिसेल असा काहीसा सूर राजकीय तज्ञ्जांच्या चर्चेतून दिसत होता. गेल्या निवडणूकीत विजय मिळवूनही अवघ्या वर्षभरात सत्तेपासून दूर बसावं लागल्यानं त्याचं उट्ट काँग्रेस काढेल अशी चर्चा निकालाचे आकडे हाती येईपर्यंत होती.
गेली 15 वर्ष मध्य प्रदेशात भाजपची शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात सत्ता आहे, त्यामुळे अँटी इन्कमबन्सी फॅक्टरचे चान्स जास्त होते. राजकारणात सतत तेच नेतृत्व असेल पक्षात मरगळ येते, प्रशासनावर तितका अंकुश राहतोच असं होत नाही, अशी नानाविध कारणं असतात, त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत चौहान यांचा पत्ता कापला जाईल अशी चर्चा होती.
शिवराजसिंह चौहान जो मध्य प्रदेशमधला भाजपचा चेहरा आहे, त्यांना लोक कंटाळे आहेत, त्यांना जनतेची साथ मिळणार नाही, अशी कुठेतरी चर्चा काँग्रेसकडून करण्यात आली होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं अशातच डाव साधला. शिवराज यांना पहिली यादी जाहीर झाली होती, त्यावेळी त्यांचं नाव त्यात नव्हतं, त्यामुळे काँग्रेसच्या चर्चांना आणखी फोडणी मिळाली आणि काँग्रेस तिथेच काहीशी सुस्तावली किंवा जरा निर्धास्त झाली असं म्हणता येईल.
पण निवडणुका असल्यानं शिवराजसिंह यांच्यासारख्या मधाळ बोलणाऱ्या नेत्यानं कोणीही तक्रार न करता, आपलं काम सुरु ठेवलं. दुसरी यादी त्यानंर मध्य प्रदेशमधली जाहीर करण्यात आली, त्यात शिवराज यांचं नाव होतं, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला, पण याचसोबत शहा, मोदी, नड्डांनी केंद्रात मंत्री आणि खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं, शिवाय मध्य प्रदेशात मुख्यमंत्री म्हणून चेहरा जाहीर केला नाही, त्यामुळे कुठेतरी प्रचारात आलेली मरगळ भाजपला झटकून देवून कामं करावं लागलं, जर भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला असता तर कदाचित भाजपला फटका बसू शकला असता, कारण राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या नेत्यांच्या आशा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होताच मावळल्या असत्या आणि जे काही होईल त्याला तो उमेदवार जबाबदार राहिला असता, शिवाय खासदारांना, केंद्रीय मंत्र्यांनाही यामुळे रिंगणात उतरून २५ लाखांच्या लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या मंंडळींना ५ लाखाच्या मतदारसंघात आपला कस लावून, निवडणूक जिंकून यावं लागलं.
केवळ इतकंच नाही, शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेली मोदींची भेट असेल, त्यांनी राज्यात राबवलेल्या योजना असतील, शेतीमध्ये मध्य प्रदेशला शिवराज यांनी गेल्या १० वर्षात अग्रेसर करण्यात मोठा वाटा उचलला आहे, लाडली बहना योजना चौहान यांना किंबहुना भाजपला तारक ठरली असली, तरी चौहान यांनी मध्य प्रदेशात विकास केला आहे हेही तितकंच खरं आहे, महिलांचा सन्मान राखणं, त्यांच्यामध्ये आपली प्रतिमा उचावणं आणि मामाजी म्हणून महिलांमध्ये त्यांना मिळालेली लोकप्रियता हे काही चौहान यांच्या विजयाचे 'राज' आहेत
मोदी, शहांची स्ट्रॅटेजी मध्य प्रदेशात कामी आली असली तर चौहान यांचाही या विजयात मोलाचा वाटा आहे आणि त्यातही केंद्रीय मंत्री, खासदारांना अनपेक्षितपणे पटावर उतरवून काँग्रेसला चीत केलं, त्यामुळे भाजपच्या सांघिक यशाचे अनेक कंगोरे आहेत, त्यामुळे आगामी काळात काँग्रेसला आपल्या पराभवाचं विश्लेषण करताना, भाजपने विजयात हुरळून न जाणं आगामी लोकसभेसाठी जास्त फायद्याचं ठरू शकतं!
Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
BLOG : विजयी 'मध्य प्रदेश', जिंकण्याचं शिव'राज'
दीपक पळसुले, एबीपी माझा
Updated at:
03 Dec 2023 06:26 PM (IST)
BLOG
Published at:
03 Dec 2023 06:26 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -