रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान शांततेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात एकूण 71.93 टक्के मतदान झालं आहे. 11 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. मतदानासाठी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.


दुसऱ्या टप्प्यात एकूण 19 जिल्ह्यांतील 72 जागांसाठी मतदान पार पडलं. एक हजारापेक्षा जास्त उमेदवार यावेळी रिंगणात आहे. छत्तीसगडच्या सत्तारुढ भाजप मंत्रिमंडळातील नऊ मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं आहे.


72 जागांसाठी भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी 72 उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय आप (68), जनता काँग्रेस (अजित जोगी) (47), आंबेडकर पार्टी ऑफ इंडिया (एपीआय) (40), बसप (27), इतर (229), अपक्ष (493) उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 1 हजार 79 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 111 महिला उमेदवारांचा समावेश आहे.


पहिल्या टप्प्यात 90 पैकी 18 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. नक्षलग्रस्त भागातील आठ जिल्ह्यात मुख्यमंत्री रमणसिंह यांच्यासह 190 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.