Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता, मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो, तर मला असे वागवले नसते, असा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी थेट दावा केल्याने महायुतीसमोर ऐन निवडणुकीत धडकी भरण्याची चिन्हे आहेत. आज भुजबळ यांच्या दाव्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे.
भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात ह्या बद्दल आभार
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत भुजबळ यांना खोचक शब्दात टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भुजबळ साहेब तुम्ही खरे बोललात ह्या बद्दल आभार. पी जातीवादी आहे हे बोलण्याची हिम्मत तुम्हीच दाखवू शकता.
सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनीही छगन भुजबळ यांच्या पुस्तकातील दाव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे. मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे, काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स याचा 95 टक्के वापर विरोधकांविरोधात केला जात आहे. वॉशिंग मशीनमध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत असल्याचा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला आहे. फडणीवस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली, ते मुख्यमंत्री असताना कारवाई केली आणि त्यांनी फाईल दाखवली, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या