स्थानिक विरुध्द पार्सल हा एकमेव मुद्दा घेऊन चंद्रपूर विधानसभेचे मैदान पुन्हा एकदा २०१९ साठी तयार होत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा केंद्रस्थानी होता, मात्र २०१४ च्या मोदी लाटेने स्थानिक अस्मितेच्या या निखाऱ्यांवर पाणी फिरवलं आणि तथाकथित पार्सल असलेले भाजपचे नाना शामकुळे सलग दुसऱ्यांदा आमदार झाले आणि ते ही ३० हजारांच्या मताधिक्याने. स्थानिक अस्मितेचे हे निखारे तेव्हा थंड झाले असले तरी पुन्हा एकदा ते फुलायला सुरुवात झाली आहे. आमदार नाना शामकुळे हे स्थानिक नसल्यामुळे चंद्रपूरला पुरेसा वेळ देत नाहीत आणि निष्क्रिय आहेत असा विरोधकांचा आरोप आहे.

२००९ साली कोणाच्याही ध्यानीमनी नसतांना अचानक नागपूरच्या नाना शामकुळेंना भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आणि ते अलगद आमदार झाले. सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांच्यात असलेल्या सुप्त राजकीय संघर्षामुळे विधानसभेसाठी कुठल्याच एका नावावर एकमत होत नसल्याचं कारण त्यावेळी देण्यात आलं होतं. हा संघर्ष टाळण्यासाठी नितीन गडकरी यांनी नाना शामकुळे यांना चंद्रपुरात पाठवलं असल्याचं तेव्हा सांगण्यात आले. मात्र नाना शामकुळे यांची ही चंद्रपुरातली एन्ट्री अनेकांना रुचली नाही. याच मुद्द्यावरून भाजपचे अतिशय सक्रिय नेते असलेल्या किशोर जोरगेवार यांनी पक्ष सोडला आणि विधानसभेसाठी स्थानिकच आमदार हवा, हा मुद्दा घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नाना शामकुळे यांना तिसऱ्यांदा पक्षाची उमेदवारी मिळू नये असं वाटतं.  यामुळे किशोर जोरगेवार यांना भाजपमधूनच गुप्त रसद मिळण्याची दाट शक्यता आहे.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं जन्मगाव असलेल्या चंद्रपूर शहरातून सुधीर मुनगंटीवार आणि हंसराज अहिर यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपली मोहर उमटवली आहे. त्यामुळेच भाजपसाठी हा मतदार संघ अतिशय प्रतिष्ठेचा आहे. १९९५ पर्यंत चंद्रपूर म्हणजे काँग्रेस असं समीकरण होतं. मात्र १९९५ च्या भाजप-शिवसेनेच्या लाटेत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला आणि सुधीर मुनगंटीवार आमदार झाले. त्यानंतर भाजपने आजपर्यंत या मतदारसंघावर स्वतःची पकड सैल होऊ दिलेली नाही. आतापर्यंत तब्बल तीन वेळा सुधीर मुनगंटीवार यांनी आणि मतदार संघ आरक्षित झाल्यानंतर नाना शामकुळे दोनवेळा आमदार झाले. मात्र या वेळी परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला तब्बल २५ हजारांची आघाडी या मतदार संघाने मिळवून दिल्याने अनेक वर्षानंतर काँग्रेस पक्षाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मतदारसंघातील काँग्रेससाठी अनुकूल असलेली परिस्थिती पाहून पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र शोकांतिका म्हणजे व्यापक जनाधार नसलेल्या या इच्छुकांना उमेदवारी द्यायची कशी असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते या एकमेव गुणवत्तेवर या इच्छुकांकडून तिकीट मागितलं जातंय. मात्र या वेळी निवडून येण्याची क्षमता हा एकमेव आधार उमेदवारी देतांना असेल हे काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच किशोर जोरगेवार यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जोरगेवार यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळवली होती आणि मतदारसंघात शिवसेनेचा जनाधार आणि संघटन नसतांना देखील ५० हजार मतं घेतली होती. यावेळी भाजप-शिवसेना युती होणार असल्यामुळे जोरगेवार हे काँग्रेसचा पर्याय निवडू शकतात. जोरगेवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि काँग्रेसला अनुकूल असलेले वातावरण एकत्र आले तर या विधानसभा मतदारसंघात चमत्कार घडू शकतो.

काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असलेले किशोर जोरगेवार हा मतदारसंघात अतिशय परिचित आणि सक्रिय असलेला चेहरा आहे. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून त्यांनी आपणच सक्षम पर्याय असल्याचं चित्र तयार केलंय. तर दुसरीकडे विद्यमान आमदार नाना शामकुळे यांनाच पुन्हा भाजप कडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. नाना शामकुळे हे निष्क्रिय असल्याचा विरोधकांचा ठपका असला तरी गेल्या १० वर्षात त्यांच्यावर कुठलाच भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही किंवा त्यांच्या बाबत कुठलाच वाद निर्माण झालेला नाही. यासोबतच स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध असला तरी वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन करण्यात त्यांना यश मिळालंय. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपला मतदान न करणाऱ्या नवबौध्द समाजाला त्यांनी गेल्या १० वर्षात पध्दतशीर पणे स्वतःच्या मागे उभं केलंय. नाना शामकुळे यांचे संघ परिवाराशी अतिशय चांगले संबंध असल्यामुळे पार्सल आणि निष्क्रिय असल्याचा ठपका असून देखील भाजपचं कॅडर वोटिंग त्यांच्यापासून लांब गेलेलं नाही.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात नवबौध्द मतदारांची संख्या लक्षणीय आहे. हा मतदार प्रकाश आंबेडकरांबाबत सहानुभूती ठेवून असला तरी त्यांच्या पक्षाला मतदान करेल असं निश्चितपणे सांगता येत नाही. २०१४ च्या विधानसभेत हा समाज भाजपच्या तर २०१९ च्या लोकसभेत काँग्रेसच्या पाठीशी भक्कम पणे उभा राहिलाय. अतिशय व्यवस्थित रणनीती तयार करून मतदान करणारा हा समाज आगामी निवडणुकीत वंचित-बहुजन आघाडीच्या मागे उभा राहिल्यास आश्चर्यकारक निकाल येऊ शकतात.

केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेत भाजपची सत्ता असूनही चंद्रपूर शहर आजही विकासाच्या बाबतीत वंचितच आहे. खराब रस्ते, उघडी गटारं, अतिक्रमणाची समस्या आणि अव्यवस्थित पाणी पुरवठा आजही कायम आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असलेले बाबुपेठ, वरोरा नाका, दाताळा आणि पठाणपुरा उड्डाणपूल अजूनही दृष्टिपथातच आहे. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी देऊन देखील स्थानिकांना रोजगाराच्या संधी न देता परप्रांतीयांना प्राधान्य दिलं जातंय. विकासाबाबत अनेक मूलभूत प्रश्न असले तरी येणारी विधानसभा निवडणूक पुन्हा एकदा मुद्यांपेक्षा व्यक्तिकेंद्रित होण्याचीच शक्यता जास्त आहे.