महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षात काका-पुतण्यांच्या लढतीचा मोठा इतिहास पाहायला मिळतो. याच काका-पुतण्यांच्या लढतीमध्ये आणखी एका घराण्याचं नाव सामील झालं आहे. ते म्हणजे बीडचे क्षीरसागर कुटुंब. राजकीय महत्वाकांक्षेतून क्षीरसागर कुटुंबात उभी फूट पडली आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी दंड थोपटले.

बीडच्या माजी खासदार केशर काकू क्षीरसागर या तब्बल चाळीस वर्षे बीडच्या राजकारणामध्ये सक्रिय होत्या. त्यांच्यानंतर हाच वारसा पुढे जयदत्त क्षीरसागर यांनी चालवला. जयदत्त क्षीरसागर हे आघाडी सरकारच्या काळांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. बीडचे पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं आहे. जयदत्त क्षीरसागरांची भाजपसोबत असलेल्या सलगीमुळे राष्ट्रवादीने जयदत्त क्षीरसागर यांना साईड ट्रॅक करायला सुरुवात केली आणि  संदीप क्षीरसागर यांना बळ मिळत गेले.  पुतण्या संदीप शिरसागर यांना राष्ट्रवादीतून मिळणाऱ्या रसदीमुळे जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सध्या जयदत्त क्षीरसागर हे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री आहेत.

बीड विधानसभा मतदारसंघात सेनेचा वरचष्मा

बीड जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचा वरचष्मा असलेला एकमेव मतदारसंघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ होय. शिवसेनेचे सुरेश नवले हे याच मतदारसंघातून दोनदा आमदार झाले. यापैकी एका टर्मला तर मंत्री सुद्धा राहिले होते. त्यांच्या नंतर सुनील धांडे हे शिवसेनेच्या तिकीटावर बीडचे आमदार झाले. एखादा अपवाद वगळता बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच परंपरागत लढत राहिली आहे.

शिवसेनेत आयात विरुद्ध निष्ठावान असा संघर्ष

बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध क्षीरसागर असाच पारंपरिक संघर्ष पाहायला मिळाला होता. आता खुद्द जयदत्त क्षीरसागर हेच शिवसेनेमध्ये आल्यामुळे निष्ठावान शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. अनिल जगताप, कुंडलिक खांडे, विलास महाराज शिंदे अशा निष्ठावान शिवसैनिकांसोबत आगामी काळात जयदत्त क्षीरसागर कितपत जमवून घेतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

2014 च्या बीड विधानसभा निवडणुकीमध्ये, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मते

राष्ट्रवादीचे उमेदवार, जयदत्त क्षीरसागर - 77 हजार 134 मते
भाजप मित्रपक्ष उमेदवार, विनायक मेटे - 71 हजार 2 मते
तर शिवसेनेचे उमेदवार, अनिल जगताप - 30 हजार 691मते


बीड नगरपालिकेत क्षीरसागर कुटुंबाची मागच्या पंचवीस वर्षापासून सत्ता आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे लहान बंधू भारतभूषण क्षीरसागर हे 25 वर्षापासून बीड नगरपालिकेत सत्तेत आहेत. 2016 मध्ये याच निवडणुकीवरून क्षीरसागर कुटुंबामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आणि एकसंघ असलेले क्षीरसागर कुटुंब दुभंगले.

नगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा काका-पुतणे आमनेसामने

बीड जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर संदीप क्षीरसागर हे शिक्षण सभापती झाले. त्यानंतर 2016 मध्ये आलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये नेतृत्व करण्याची मागणी त्यांनी केली आणि इथूनच चुलता पुतण्यातील वाद वाढत गेला. याच निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीकडून पॅनल उभा केला. या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष हा जनतेतून थेट निवडून द्यायचा होता आणि याच निवडणुकीमध्ये दोन सख्खे भाऊ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले.

पहिल्याच निवडणुकीत पुतण्या ठरला काकावर भारी

चुलते जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात बंड पुकारल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिकेची निवडणूक जोमानं लढली. या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी वडील रवींद्र क्षीरसागर यांना उभे करून संदीप क्षीरसागर यांनी कडवी झुंज दिली.. राष्ट्रवादी काँग्रेस ह्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांच्या सोबत होती तर संदीप क्षीरसागर यांनी मात्र काकू नाना विकास आघाडी नावाने पॅनल तयार केला होता. या निवडणुकीत नगराध्यक्ष जरी संदीप क्षीरसागर यांच्या गटाचा झाला नाही तरी मात्र संदीप क्षीरसागर यांच्या काकू-नाना विकास आघाडीला 20 नगरसेवक निवडून आणता आले. राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र 19 नगरसेवक निवडून आणता आले. पहिल्याच संघर्षात बीड नगरपालिकेच्या सभागृहात चुलत्यापेक्षा पुतण्यांचे नगरसेवक जास्त निवडून आले होते.

रवींद्र क्षीरसागर विरुद्ध भारतभूषण क्षीरसागर अशी लढत झाली

या निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. क्षीरसागर कुटुंबात फुटल्यानंतर भारतभूषण क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत गेले आणि रवींद्र क्षीरसागर मात्र तटस्थ राहिले. रवींद्र शिरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे वडील आहेत. बीड शहराच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन सख्खे भाऊ एकमेकाच्या विरोधात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले होते. या निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर यांच्यानंतर एमआयएमच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाले होती तर रवींद्र क्षीरसागर तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते.

जिल्हा परिषद निवडणुकीतही पुतण्याची चुलत्यांना धोबीपछाड

क्षीरसागर कुटुंबात राजकीय उलथापालथी घडत असताना चुलत्या-पुतण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र एकनिष्ठ होता. याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कडून संदीप क्षीरसागर यांना मोठे पाठबळ मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत भूमिका ही जरी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राहिली तरी संदीप क्षीरसागर यांना मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी चांगलाच आधार दिला. म्हणूनच नगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर गटाचे तीन सदस्य निवडून आले तर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा  केवळ एक जिल्हा परिषद सदस्य निवडून आला. विशेष म्हणजे याच निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या गटाचे सात पंचायत समिती सदस्य निवडून आले तर जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा केवळ एक सदस्य निवडून आला होता.

लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागरांची भाजपला मदत

खरं तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच, मागच्या वर्षभरापासून जयदत्त क्षीरसागर यांची पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढली होती. जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीमध्ये नाराज आहेत, हा संदेश सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमातून क्षीरसागरानी देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रीतम मुंडे यांना मदत करण्याची जाहीर भूमिका घेतली.. राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपला सहकार्य करण्याची भूमिका क्षीरसागरांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत बीडमधे प्रीतम मुंडे यांना 96388 तर बजरंग सोनवणे यांना 90 हजार 565 मते पडली.

पंकजा मुंडेंची भूमिका निर्णायक

बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्ह्याच्या पालक मंत्री पंकजा मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे तिकडे विनायक मेटे यांचे विश्वासू शिलेदार असलेले राजेंद्र मस्के हे काही दिवसापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले. राजेंद्र मस्के हे पंकजा मुंडे यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून बीड विधानसभा मतदारसंघात काम करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे राजेंद्र मस्के बाबतीत काय भूमिका घेतात यावर सुद्धा या विधानसभा निवडणुकीतील निकाल अवलंबून असणार आहे.

वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही महत्वाची

बीड मतदारसंघांमध्ये मराठा, मुस्लिम, दलित,ओबीसी आणि ब्राह्मण समाजाची मते लक्षणीय आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या मतदारसंघातून 11000 पेक्षा जास्त मते मिळाली.  त्यामुळे वंचित बहुजन आघाडीकडून नेमकं कोण निवडणूक लढवणार यावर ही निवडणूक किती रंगतदार होणार हे ठरणार आहे

विनायक मेटे यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत

बीड विधानसभा मतदारसंघात मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध विनायक मेटे अशीच लढत झाली होती. यात पाच हजार मतांनी विनायक मेटे यांचा क्षीरसागरांनी पराभव केला होता. यापूर्वी जेव्हा जयदत्त क्षीरसागर आणि विनायक मेटे हे एकाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, त्यावेळीही मेटे आणि क्षीरसागर यांचं एकमेकांशी फारसं पटत नव्हतं. अगदी पक्ष पातळीवर एकत्रित काम करणारे क्षीरसागर आणि मेटे जिल्ह्यात मात्र एकमेकांसमोर दंड थोपटून उभे टाकायचे.. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही आपणच शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार असू असं विनायक मेटेंनी यापूर्वीच जाहीर केलंय म्हणून जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर आणि विनायक मेटे यांच्यातील लढत होणार आहे.