Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात निवडणूक ज्वर सध्या टिपेला पोहचला आहे.‌ काल (29 ऑक्टोबर) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. बंडखोरीचं हेच चित्र अकोला जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पहायला मिळालं. 'पार्टी विथ डिफरन्स', 'शिस्तबद्ध पक्ष' अशी ओळख असलेल्या भाजपाला अकोल्यात बंडखोरची सर्वाधिक झळ पोहोचलेली पाहायला मिळाली.


यासोबतच जिल्ह्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचं अमाप पीक आल्याचं चित्र आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या दिग्गजांनी बंडखोरी केली आहे. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीने ग्रासले आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरच्या माघारीपर्यंत यातील किती 'बंडोबां'ना पक्ष 'थंड' करतो याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागलेली आहे.


बंड शमविण्यासाठी सर्वच पक्षांत बड्या नेत्यांची धावपळ


अर्ज भरण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी अकोला जिल्ह्यातल्या काही मतदारसंघात बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी बंडखोरी करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यामध्ये प्रामुख्याने महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळाली. त्यामुळे आता या बंडखोरांना रोखण्याचं मोठं आव्हान सर्वच राजकीय पक्षांसमोर असणार आहे. अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कुणी-कुणी बंडखोरी केली आहे?, ते पाहूयात.


अकोला पश्चिम : महाविकास आघाडीत अकोला पश्चिम मतदार संघ हा काँग्रेसच्या वाटेवर गेला आहे. तर महायुतीत मतदारसंघ भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे.  काँग्रेसकडून या मतदारसंघात साजिद खान पठाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. तर भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात पक्षाच्या दिग्गजांनी बंडखोरी करत दंड थोपटले आहेत 


अकोल्यात काँग्रेसच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटांनी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाली आहे. साजिद खान पठाण यांना काँग्रेसन तिकीट दिल्यामुळे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते डॉ. जीशान हुसेन यांनी बंडाचा झेंडा हाती घेत वंचित बहुजन आघाडीची वाट धरली आहे. सर ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख आणि महापालिकेतील माजी गटनेते राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत दंड थोपटले आहेत. हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला देण्यासाठी आधीपासूनच ठाकरे गटाचा विरोध होता. राजेश मिश्रा यांच्यासोबतच ठाकरे गटाचे दुसरे नेते  प्रकाश डवलेंनी देखील बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल भरला. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री प्रा.अजहर‌ हूसेन यांचे पुत्र जिशान हुसेन यांनी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत उमेदवारी दाखल केली. यासोबतच काँग्रेस नेते आणि माजी महापौर मदन भरगड यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 


शिस्तबद्ध पक्ष समजल्या जाणाऱ्या भाजपातही अकोला पश्चिम मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणजेच भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या विरोधात भाजपच्या दोन नेत्यांनी बंड पुकारला.. भाजपचे ज्येष्ठ नेते हरीश आलिचंदानी आणि डॉ. अशोक ओळंबे हे भाजपकडून इच्छुक होते. मात्र पक्षाने त्यांचा तिकीट नाकारलं आणि विजय अग्रवाल यांना संधी दिली. त्यामुळे दोन्ही नेते नाराज होते. ओळंबे यांनी प्रहार पक्षात प्रवेश करत तिसऱ्या आघाडी कडून आपली उमेदवारी दाखल केली. तर हरीश आलिचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल आहे. या दोघांची उमेदवारी भाजपासाठी मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मुर्तिजापूर : मुर्तीजापुर मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2009 पासून भाजपाचे हरीश पिंपळे येथून सतत तीनदा विजय झालेले आहेत. यावेळेस त्यांचं तिकीट कापला जाईल अशी मोठी शक्यता आणि चर्चा संपूर्ण मतदारसंघात होतील. भाजपच्या पहिल्या दोन्ही यादींमध्ये त्यांचं नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीची शक्यता मावळली होती. मात्र अगदी शेवटच्या क्षणी पक्षाने चौथ्यादा हरीश पिंपळे यांच्यावर परत विश्वास ठेवत त्यांना रिंगणात उतरवलं आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. सुगत वाघमारे यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. मात्र मुर्तीजापुर मतदारसंघात तीनही प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. 


मुर्तीजापुरमध्ये शरद पवार गटाच्या रवि राठीनी पक्षांतराचा नवा विक्रम रचला आहे. त्यांनी चार दिवसात तीन राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीन तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपची वाट धरली होती.. मात्र, भाजपने विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना पुन्हा चौथ्यांदा संधी दिलीये. त्यामुळं रवी राठी नाराज झाले.. थेट त्यांनी प्रहार पक्षात प्रवेश केलाय. आणि तिसऱ्या आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2019 च्या निवडणुकीत रवी राठी यांनी राष्ट्रवादीकडून तिसऱ्या क्रमांकाची 42 हजार मते घेतली होती. तर याच मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते महादेव गवळे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. 


भाजपने हरीश पिंपळे यांना उमेदवारी दिल्याने भाजपाचे बंडखोर आणि बोर्टा गावाचे युवा सरपंच पंकज सावळे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली सावळे यांना भाजपातील असंतुष्टांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. याशिवाय वंचितने डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी दिलीय. यामुळे वंचितच्या ज्येष्ठ नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा इंगळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.


बाळापूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसून आलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना या ठिकाणी बच्चू कडूच्या परिवर्तन महाशक्ती म्हणजेच तिसरा आघाडीने पाठिंबा दिला.‌ त्यांना आधी प्रहारकडून पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी कृष्णा अंधारे यांनी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.  कृष्णा अंधारे हे शिंदे गटाकडून तसेच राष्ट्रवादीकडून बाळापुर मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र बाळापुर मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाटेवर गेला आणि ते नाराज झाले. अखेरच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. याच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढत असलेले उमेदवार आणि काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी निवडणुकीच्या तीन आठवड्यापूर्वीच काँग्रेसमधून वंचितमध्ये प्रवेश घेतला. त्यामुळे खतीब यांची बंडखोरी येथून महाविकास आघाडीतल्या ठाकरे गटाचे उमेदवार असलेले नितीन देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे.


अकोट : अकोट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे नेते रामप्रभू तराळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केले. ठाकरे गटाकडून ते इच्छुक होते. मात्र अकोट विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेवर गेल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे तराळे यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय.


अकोला पुर्व :  अकोला पूर्वमध्ये वंचितचच्या जेष्ठ नेत्याने बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वंचित बहुजन आघाडीत मोठी खळबळ उडाली आहे. वंचित ते ज्येष्ठ ओबीसी नेते डॉ.संतोष हुशे हे पक्षाकडून अकोला पूर्व मतदार संघासाठी इच्छुक होते. मात्र वंचितने त्यांना तिकीट नाकारलं. आणि ज्ञानेश्वर सुलतान यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज असलेल्या संतोष हुशे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. डॉ. हुशे हे गेल्या 40 वर्षांपासून प्रकाश आंबेडकरांचे अत्यंत निकट आणि विश्वासू नेते समजले जातात. 


बंडखोरांना थांबवण्याचे राजकीय पक्षांपुढे आव्हान 


अकोला जिल्ह्यातील सर्वच पक्षांना बंडखोरांच्या उमेदवारीचा फटका बसला आहे. दरम्यान, आता या बंडखोरांना रोखण्याचं आघाडी आणि युतीला मोठं आव्हान असणार आहे. कारण, 2019 च्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात दोन जागांवरील निकाल हे फक्त दोन हजार मतांपर्यंत असल्याने कोणताच राजकीय पक्ष कोणत्याही प्रकारची चूक करायला तयार नाही. गेल्या निवडणुकीत अकोला पश्चिममधून भाजपाचे गोवर्धन शर्मा यांनी फक्त 2593 मतांनी काँग्रेसच्या साजिद खान पठाण यांचा पराभव केला होता. तर मुर्तीजापुरमधून भाजपाचे हरीश पिंपळे हे वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांच्यापेक्षा फक्त 1910 मतांनी आघाडी घेत विजय झाले होते. त्यामुळे बंडखोरांच्या मतांमुळे सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांचं देऊळ पाण्यात आहे. त्यामुळे ही बंडखोरी मोडून काढण्यासाठी सर्वच पक्ष कसोशीने प्रयत्न करणार आहेत, हे मात्र निश्चित.


हे ही वाचा