मुंबई : काही मतदारसंघातील मतदारांना प्रत्येक निवडणुकीत बदल हवा असतो. मुंबईतला भायखळा हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. प्रत्येक निवडणुकीला भायखळा विधानसभेला नवीन आमदार मिळतो. म्हणजेच विधानसभा निवडणूक आणि नवीन आमदार हे समीकरण जणू जुळलेलच आहे. मग ते 2004 च्या विधानसभा निवडणुकीत अरुण गवळी असो, 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मधुकर चव्हाण असो किंवा 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एमआयएमचे वारिस पठाण असो.
मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते तेव्हा भायखळ्याच्या दगडी चाळीत राहणारा अरुण गवळी त्याच्या अखिल भारतीय सेनेच्या तिकीटावर या मतदार संघातून निवडून आला. त्यानंतर 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे मधुकर चव्हाण यांनी अरुण गवळीचा पराभव करत भायखळा विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकवला.
जनतेला अपेक्षित अशी कामं मधुकर चव्हाण यांच्याकडून झाली नाहीत. ज्याचा फटका त्यांना 2014 च्या निवडणुकीमध्ये बसला. 2014 मध्ये मोदी लाट होती, पण मोदी लाटेपेक्षा आपल्या न केलेल्या कामांचा फटका मधू चव्हाण यांना बसला आणि एमआयएमचे वारिस पठाण हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.
कोण आहेत वारिस पठाण?
वांद्रे येथील रहिवासी असलेले वारिस पठाण हे पेशाने वकील आहेत. 1993 चा बॉम्बब्लास्ट खटला, अभिनेता सलमान खानची हिट अँड रन केस यामुळे वारिस पठाण चर्चेत आले. वारीस पठाण पाहिले वकील ठरले ज्यांनी टाडा (tada) केसमधील आरोपीला जामीन मिळवून दिला आहे. याआधी टाडाच्या आरोपीला कधीच जामीन मिळाला नव्हता.
2019 ची लढत कशी असू शकते?
एमआयएमकडून वारिस पठाण यांनाच भायखळा विधानसभेतून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. तर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांची युती झाली तर त्याचा वारिस पठाण यांना फायदा होईल.
2014 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून मधु चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. तर शिवसेनेचे यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांना तिकीट मिळावे यासाठी यशवंत जाधव यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे भायखळा विधानसभेच्या जागेवर भाजपचा उमेदवर असेल की शिवसेनेचा हा मोठा प्रश्न आहे.
तर काँग्रेसकडून आमदारकीचा अनुभव असलेले मधुकर चव्हाण यांना पुन्हा संधी मिळू शकते. तसेच काँग्रेसचे नगरसेवक मनोज जामसुतकर हेही त्यांच्या पत्नीसाठी भायखळा विधानसभेच्या जागेसाठी प्रयत्नशील आहेत.
अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी या सध्या महानगरपालिकेमध्ये नगरसेविका आहे आणि त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीतसुद्धा अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांना 20 हजार 895 मतं मिळाली होती. तर भाजपचे मधु चव्हाण हे अवघ्या दीड हजार मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे गीता गवळी जरी निवडून आल्या नाहीत तरी त्या कोणाच्याही पराभवाला कारणीभूत ठरु शकतात.
2014 विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान
एमआयएम - वारिस पठाण - 25 हजार 314
भाजप - मधु चव्हाण - 23 हजार 957
काँग्रेस - मधुकर चव्हाण - 22 हजार 21
अखिल भारतीय सेना - गीता गवळी - 20 हजार 895
मनसे - संजय नाईक - 19,762.
मतदानाचा टक्का कमी
भायखळा विधानसभा मतदारसंघात जवळपास अडीच लाख मतदार आहेत. परंतु त्यामध्ये अवघेत पन्नास टक्केच मतदान होतं. त्यामुळे अवघ्या दीड-दोन हजार मतांच्या फरकाने उमेदवार निवडून येतो. भायखळा विधानसभेची लढाई ही चुरशीची असेल हे मात्र नक्की.
भायखळा मतदारसंघ : भाजप, एमआयएम आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2019 03:37 PM (IST)
काही मतदारसंघातील मतदारांना प्रत्येक निवडणुकीत बदल हवा असतो. मुंबईतला भायखळा हा त्यापैकीच एक मतदारसंघ आहे. प्रत्येक निवडणुकीला भायखळा विधानसभेला नवीन आमदार मिळतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -