Buldhana Shivsena : राज्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळत आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधणार असल्याचं निश्चित झाल्यानंतर आता बुलढाण्यातही शिंदे गटाला धक्का देण्यात येणार आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार व आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे तीन वेळेस आमदार असलेले व सध्या भाजपात असलेले माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे बुलढाण्याचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना या मतदार संघात तीन वेळा आमदार राहिलेल्या विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती उद्धव गटाकडून आखली जात असल्याची चर्चा सध्या जिल्हाभरात होत आहे. मात्र विजयराज शिंदे कधी शिवबंधन बांधतील याबाबत एबीपी माझाने शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले की ही लोकशाही आहे. आणि मी 15 वर्ष शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगं काय...? मात्र अद्याप उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही. मात्र बुलढाण्यात आता बंडखोर आमदार संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गटाकडून हालचालींना वेग आल्याचं चित्र राजकीय वर्तुळात आहे.


आणखी वाचा :
भाजप आणि संजय राठोडांना उद्धव ठाकरेंचा धक्का, दिग्गज माजी मंत्री शिवबंधन बांधणार