Sanjay Deshmukh Shiv Sena : यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख लवकरच शिवबंधन बांधणार आहे. संजय राठोड आणि भाजपला धक्का मानला जातोय.   संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे. देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला तर यवतमाळ जिल्ह्यात त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


20 ऑक्टोबर रोजी संजय देशमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय देशमुख शिवबंधन बांधणार आहेत. मंत्री संजय राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहेत. संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. दोन्ही नेत्यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती.  
 


संजय देशमुख यांची राजकीय कारकिर्द -


-1998 मध्ये शिवसेनेतून राजकीय कारकिर्द सुरू. संजय राठोडांसोबत होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख. 


-मात्र, 1999 च्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करीत त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होताय. 


-संजय देशमुख हे मंत्री संजय राठोड यांचे कट्टर विरोधक आहेत. 


-संजय देशमुख हे 1999 आणि 2004 मध्ये दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विजयी झाले होतेय. 


-2009 मध्ये मतदारसंघाच्या पूनर्रचनेत दारव्हा आणि दिग्रस मतदारसंघ एक झाला होताय. या निवडणुकीत तत्कालिन दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी नव्या दिग्रसमधून लढत संजय देशमुखांचा पराभव केला होताय. 


-2019 च्या विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतंय.  


-देशमुख शिवसेनेत आल्यास दिग्रस विधानसभेसह यवतमाळ लोकसभेसाठी ठरू शकतात सक्षम उमेदवार.


यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचं राजकारण 1999 पासून कायम दोन 'संजय'भोवती फिरत आहे. यातील एक 'संजय' म्हणजे 'संजय राठोड'. तर दुसरे 'संजय देशमुख. दोघांचीही कारकिर्द सुरू झाली शिवसेनेतून. दोघंही कधीकाळचे कट्टर मित्र. मात्र, आता एकदम कट्टर 'राजकीय शत्रू'. दिग्रसचे आमदार असलेल्या संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत बंडखोरी केली. संजय राठोडांचं बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फारच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. यातूनच संजय राठोडांना राजकीय धडा शिकविण्यासाठी सेना नेतृत्वानं आता पावलं टाकायला सुरूवात केली आहे. यातील सेनेचा पहिला 'मोहरा' हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे. यातूनच उद्धव ठाकरेंनी आता थेट संजय देशमुखांना शिवसेनेत घेत संजय राठोडांना जेरीस आणण्याची रणनिती आखली आहे. 


संजय देशमुखांनी 1999 ते 2009 असं तब्बल 10 वर्ष दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2009 मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात काहीसे 'बॅकफूट'वर आल्याचं चित्र होतं. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतं. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे. 


संजय देशमुखांचा सेना, अपक्ष, काँग्रेस, भाजप, अपक्ष असा राजकीय प्रवास
संजय देशमुखांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. 1998 मध्ये त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद-मांडवा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवारीवर पराभव झाला. पुढे 1999 मध्ये ते शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख झालेत. मात्र, विधानसभेचं तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उभे राहत बंडखोरी केली. अन चमत्कार घडवत फक्त 125 मतांनी राष्ट्रवादीच्या ख्वाजा बेग यांचा पराभव केला. यावेळी विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे मंत्रीमंडळात ते युवक आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री बनलेत. 2004 मध्येही ते अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडून आलेत. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पुनर्रचित दिग्रसमधून निवडणूक लढविली. मात्र, संजय राठोडांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2019 च्या लोकसभेपुर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला. मात्र, सेनेशी युतीमूळे तिकीट न मिळाल्याने त्यांनी संजय राठोडांविरोधात अपक्ष म्हणून बंडखोरी करीत तब्बल 75 हजार मतं घेतलीत.