लखनौ : बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाहीत. बसपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुप्रिमो मायावतींनी निवडणूक न लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. समाजवादी पक्ष आणि बसपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या केवळ देशभर दौरे करणार आहेत.

अखिलेश यादव आणि अजित सिंह यांच्या जोडीने मायावती प्रचारसभांना संबोधित करतील. कट्टर विरोधक मुलायम सिंह यादव यांच्यासाठी मैनपुरीत रॅली घेण्याची तयारीही मायावतींनी केली आहे.

'बहनजी' या नावाने विख्यात असलेल्या मायावती यावेळी लोकसभा निवडणुका लढवतील, अशी अटकळ बांधली जात होती. सपासोबत झालेल्या आघाडीनंतर हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. आंबेडकरनगरपासून बिजनौरपर्यंत अनेक मतदारसंघांची चाचपणीही झाली. मात्र बसपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सुप्रिमो मायावतींनी निवडणूक न लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

एकट्या उत्तर प्रदेशातच मायावती 39 सभांचा झंझावात करणार आहेत. विशेष म्हणजे नागपुरातून त्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

गेल्या 25 वर्षांत मायावती आणि मुलायम सिंह यादव यांनी एकमेकांचं तोंडही पाहिलं नसल्याचं म्हणतात. आता अखिलेश यादवांच्या प्रयत्नांनी एकत्र आलेले यूपीतील हे दोन दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे देशभरातील जनतेच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत.