मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळ पादचारी पुलाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या 35 वर्षांच्या तपेंद्र सिंगचाही मृत्यू झाला.

35 वर्षांचा तपेंद्र वडाळ्यात भाऊ आणि आईसह राहायचा. लहानपणीच वडिलांचं छत्र त्यांनी गमावलं होतं. मोठा मुलगा असल्याने कमी वयातच त्याने घराची जबाबदारी उचलली. वयाच्या 14 व्या वर्षापासून तो नोकरी करत होता. तो गुरुवारी संध्याकाळी प्रिटिंग प्रेसमधील काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला, पण तो घरी पोहचलाच नाही.

तपेंद्रने नेहमीप्रमाणे काम संपवलं आणि घरी जाण्यासाठी निघाला. ट्रेन पकडण्यासाठी तो दादाभाई नौरोजी मार्गावरुन सीएसएमटी स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरुन जात होता. याचवेळी पूल कोसळला आणि तपेंद्रचा मृत्यू झाला.

VIDEO | मुंबई पूल दुर्घटनेत कर्ताधर्ता मुलगा गेला, कुटुंबावर दुःखाचा डोंगर


तपेंद्रच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या भावाने रुग्णालय गाठलं. दादाच्या अकस्मात मृत्यूने तपेंद्रच्या धाकट्या भावाला जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आठवणीने त्याला अश्रू आवरता येत नव्हते.

टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ असलेल्या पादचारी पुलाचा कामा रुग्णालयाजवळचा भाग काल (14 मार्च) संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला होता. पूलाचा भाग कोसळल्याने तीन महिलांसह सहा जणांचा मृत्यू झाला, तर 31 जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (35), रंजना तांबे (40), भक्ती शिंदे (40), जाहीद सिराज खान (32), तपेंद्र सिंह (35) मोहन कायगुंडे अशा सहा जणांचा मृत्यू झाला. जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. शिवाय, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकारकडून करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :

मुंबई पूल दुर्घटना : 'लोकांनी व्हिडीओ बनवण्याऐवजी मदत केली असती तर माझा भाऊ वाचला असता'


CSMT पूल दुर्घटना : नाईट शिफ्टला निघालेल्या डोंबिवलीच्या तीन नर्स परतल्याच नाहीत...






मुंबईत सीएसएमटी स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब कोसळला, सहा जणांचा मृत्यू, 32 जखमी

होय तो पूल आमचाच आहे, टोलवाटोलवीनंतर मुंबई महापालिकेची कबुली

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट चुकीचं, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री