मुंबई : पुढील काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. सर्वच पक्ष या निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. त्यामध्ये सत्ताधारी शिवसेना जोशात कामाला लागली आहे. शिवसेनेचे प्रत्येक विभागात कार्यक्रम सुरु झाले आहेत. शिवसेना शाखाप्रमुख विभागप्रमुख आदी पदाधिकारी आपल्याला तिकीट मिळावं यासाठी जोरदार कार्यक्रम घेत, आपल्या आपल्या नेत्याला खुश करण्यात दंग आहेत. मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने नेतेमंडळीही आपल्या खास माणसासाठी लॉबिंग करण्याच्या तयारी आहेत.


नेत्यांच्या मागे- मागे पळापळ
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक इच्छुक समाजसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे उमेदवारीसाठी आतापासूनच पळापळ करत आहेत. अनेक कार्यक्रमांचे तसेच सोयीसुविधांचे उद्घाटन करण्यात शिवसेना पदाधिकारी व्यस्त आहेत. मुंबईत आपल्या कार्यक्रमांना इच्छुक मंडळी अनिल परब, अनिल देसाई, सुनिल प्रभू, विनायक राऊत, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, सुरज चव्हाण, वरुण सरदेसाई या आपल्या नेतेमंडळीना बोलावून त्यांच्या हस्ते कार्यक्रम करण्यात आग्रही आहेत. या सर्व नेत्यांची वेळ मिळावी यासाठी इच्छुक शिवसेना पदाधिकारी त्यांच्यामध्ये सध्या पळापळ करताना दिसत आहेत.


कार्यक्रम सुरु; आरक्षणाकडे लक्ष 
आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर झालेली आहे त्यामध्ये मुंबई महापालिकेत नऊ वॉर्ड वाढवण्यात आलेले आहेत. वॉर्ड रचना पडल्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्ते नेते हे निवडणुकीच्या तयारीच्या कामाला लागले आहेत. त्यात प्रभाग रचना पडल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची नवीन प्रभाकर रचनेनुसार बांधणी करायला सुरुवात केली आहे. तसेच दुसरीकडे आरक्षणाकडे या इच्छुक आणि सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आरक्षण काय येतंय यावर हे इच्छुक मंडळी पर्याय देखील शोधत आहेत.


सगळीकडे तयारी मात्र निर्णय कोण घेणार ?
मुंबई आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच जण आपली तयारी करत आहेत, त्यामुळे इच्छुक समाजसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी हे आपल्या परीने आपला प्रभाग सध्या बांधत आहेत. पक्षाकडून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी नेतेमंडळींना खुश करत आहेत तर नेतेमंडळी लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत. मात्र आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील उमेदवारांबाबत निर्णय हे आदित्य ठाकरे घेणार असल्याची माहिती आहे.


टीम आदित्यचा अभ्यास पूर्ण
आगामी राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी युवा सेनाप्रमुख, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांची टीम शिवसेनेचे सर्व तयारी पाहत आहेत. यामध्ये प्रमुख मुंबई महापालिकेकडे टीम अदित्यचं लक्ष असणार आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे यांची टीम काम करत आहे. नुकताच या टीमचा मुंबई महापालिकेचा संपूर्ण अभ्यास झाल्याची देखील माहिती मिळत आहे. मुंबई महापालिकेत कोणत्या प्रभागात उमेदवार चांगला ठरु शकेल, प्रत्येक प्रभागात आपली काय ताकद आहे? आदी विषयांवर टीम आदित्यने अभ्यास केला आहे. त्यामुळे पदाधिकारी आपल्याला तिकीट मिळावे यासाठी ज्याप्रकारे नेतेमंडळींच्या मागे-मागे करत आहे ते न चालण्याची शक्यता आहे.