Bhandara Gondia Loksabha : एकेकाळी विदर्भ आणि पूर्व विदर्भ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होता. भाजपसोबत (BJP) सत्तेत असताना शिवसेनेला विदर्भात जागा देखील मिळत होत्या. मात्र, आता महाविकास आघाडीसोबत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या ताब्यातील जागांवर काँग्रेसने उमेदवार घोषित करताना शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेतल्या आहेत.


विदर्भातील रामटेक, अमरावती, यवतमाळ - वाशिम या जागा काँग्रेसच्या (Congress) ताब्यात गेल्यानं शिवसेनेच्या वाट्याला भोपळा आला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्वी भाजापला सीट विकायची, आता काँग्रेसला विकत आहेत. असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. ते भंडारा येथे बोलत होते. 


काँग्रेस जे म्हणते तेच उद्धव ठाकरे करतात 


शिवसेना मागील अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्यायचं करीत आली आहे. आम्हाला अनेकदा याचा अनुभव आलेला आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा पक्ष भाजपसोबत युती मध्ये होता, त्यावेळी सुद्धा भाजप म्हणेल तसे उमेदवार उद्धव ठाकरे देत होते. भाजपच्या मागणी नुसार भाजप म्हणेल ती सीट त्यांना द्यायचे. आज देखील उद्धव ठाकरे यांची शिवसेना हेच करत असल्याचे चित्र आहे. त्यात अगदी कधीकाळी शिवसेनेचा गड असलेला रामटेक मतदारसंघाची जागा आज काँग्रेसला देवून टाकली आहे.


खऱ्याअर्थाने ही जागा महाविकास आघाडीमध्ये पारंपरिकरित्या शिवसेनेला सुटणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. अशाच पद्धतीने 2019 मध्ये एकही सीट आम्हाला ठेवलेली नव्हती आणि त्या बदल्यात एक्सपायरी डेटच्या दोन सीट आपल्यासाठी घेतल्याचा आरोप शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.


उद्धव साहेबांना हे शोभत नाही - नरेंद्र भोंडेकर 


महायुतीमध्ये उद्धव ठाकरे असताना भाजप जे जे म्हणायचं ते ते उद्धव ठाकरे करायचे. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये आता काँग्रेस जे जे म्हणते ते ते उद्धव ठाकरे करत आहे. हाच खरा चेहरा उद्धवजींचा आहे. उद्धव ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे आणि आता ते काँग्रेसला विकत आहे. असा आरोप देखील भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. कायम विदर्भाची सीट विकून मुंबईची पाहिजे ती सीट मागून घेतात. हा शिवसैनिकांवर एकप्रकारे अन्याय असून हा प्रकार उद्धव साहेबांना  शोभत नाही, असे देखील नरेंद्र भोंडेकर म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या