मुंबई: काँग्रसचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत माहिती दिली. तसेच, वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरुन मी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन चर्चा केली असून आता शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत चर्चा करणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं. काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलीय, त्यानुसार मी उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केलीय, शरद पवारांनाही मी भेटणार आहे. आमच्यातील चर्चेता तपशील मी वरिष्ठांना देणार आहे. तसेच, महाविकास आघाडी म्हणून आम्हाला एकत्रित कार्यक्रम करायचे आहेत, त्यावरही चर्चा झालीय. मुंबईतील 2-3 जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. जाहीर झालेल्या जागांच्या बदलाबाबतचा विषय माझ्याकडे नव्हता. मैत्रीपूर्ण लढत असा विषय नाही, आमचं सरकार आणायचं आहे, 180 जागांचं आमचं टार्गेट आहे.आम्हाला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री करायचं आहे. 


महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यासंदर्भात बोलताना मैत्रीपूर्ण लढतीचा विषयच नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत, आम्हाला राज्यात 180 जागा जिंकायच्या आहेत, असेही थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 


मुंबईतील 2-3 जागांवरुन वाद


बाळासाहेब थोरात आणि  उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये ज्या जागांवर तिढा आहे, त्या जागांची अदलाबदल करण्याबाबत चर्चा झाली. मुंबईतल्या 2-3 जागांवरुन अद्यापही महाविकास आघाडीत चर्चा होत आहे. वर्सोव्याच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या जागेवर अजूनही आग्रही आहेत. मुलुंड शिवसेना ठाकरे गट तर मलबार हील विधानसभा मतदारसंघाची जागा आम आदमी पार्टी लढणार असल्याची चर्चा असतानाच शिवेसना ठाकरे गटाकडून भैरूलाल चौधरी (जैन) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघावरून सुद्धा शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यामध्ये तिढा कायम आहे. तर कुलाबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढणार असल्याची माहिती आहे.


गलिच्छ वक्तव्याचा सर्वांनीच निषेध करावा


पूर्वीचं राजकारण तात्विक पद्धतीने चालायचं, मात्र गेल्या 5 वर्षात राजकारणाचा स्तर घसरलाय. भाषण कोणत्या स्तरावर करावं हे प्रत्यकाने ठरवावं. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझी मुलगी जयश्रीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केलेलं आहे, त्याचा महाराष्ट्रातून निषेध होतोय. मात्र, मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, त्यामुळे मला माझ्या मतदारसंघातील जनतेनंच सांगितलं आहे. आम्ही इकडे आहोत, आम्ही ते पाहून घेतो, म्हणून माझे कार्यकर्तेच ते पाहून घेत आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधील घटनेवर भाष्य केलंय. जयश्री सोडा जगातील महिलांसंदर्भात केलेलं हे वक्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायचं आणि दुसरीकडे असे विचार ठेवायचे. संगमनेरमधील बोलणाऱ्या नेत्याच्या वक्तव्यावर स्टेजवरील नेतेमंडळी टाळ्या वाजवत होती हे दुर्दैवी आहे. म्हणजेच त्यांच्या मेंदूत हा विचार आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लक्ष्य केलंय.


हेही वाचा


Video: सुजय विखेचं ढोंग सगळ्यांना माहितीय; संयमी बाप संतापला, बाळासाहेब थोरातांनी टाळ्या वाजवणाऱ्यांनाही सुनावलं