बीड : जिल्ह्यातील राजकारणाची तऱ्हाच वेगळी आहे. त्यामुळेच, बीड (Beed) जिल्ह्याच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंपासून ते आत्तापर्यंतच्या युवा नेत्यांपर्यंत येथील राजकीय रंगत कायम चर्चेत असते. लोकसभा निवडणुकीतही यंदा येथील मतदारसंघात अनेकांच्या भुवया उंचावणारा निकाल पाहायला मिळाला. मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीचा व आंदोलनाचा फटका भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बसल्याने येथे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात नेमकं काय होणार, कोणाच्या पारड्यात बीडची जनता कौल देणार हे पाहावे लागेल. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा (Ashti) मतदारसंघात भाजप नेते आणि माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao dhonde) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, गेली अनेक वर्षे भाजपात काम केल्याने निवडणूक प्रचारसभेत त्यांना अपक्ष म्हणून स्वत:चे असलेले चिन्हच लक्षात आले नाही. त्यामुळे, कार्यकर्त्यांना चक्क तुतारी वाजवण्याचे आवाहन त्यांनी केलंय.
बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. अशातच प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी आपले चिन्ह विसरून कार्यकर्त्यांना तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. मात्र, ही बाब व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर लागलीच त्यांनी सरवासावर केली. भीमराव धोंडे हे भाजपाचे माजी आमदार आहेत. मात्र, यावेळी भाजपाने त्यांना उमेदवारी डावलून सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. अशातच त्यांच्याकडून प्रचाराची सुरुवात देखील झाली आहे, आज आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते आपलं निवडणुकीतील चिन्ह विसरले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार गटाचे चिन्ह असलेले तुतारी वाजवण्याचे आवाहन केले. परंतु, ही बाब कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सरवासारव करत आपल्या चिन्हाचा उल्लेख केला. परंतु सध्या मतदारसंघात त्यांचा हा व्हिडिओ आणि याची चर्चा चांगलीच जोर धरू लागलीय.
दरम्यान, भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले असून आष्टी मतदारसंघात त्यांना महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांचे आवाहन आहे. तर, या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथील मतदासंघात तिरंगी लढत होत आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एसटी फुकट, महिन्याला 3000; राहुल गांधींकडून काँग्रेसच्या 5 घोषणा