मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. मात्र या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील पाच ते सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली फेरी पूर्ण झाली असून आज दुसरी फेरी होणार आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शाह सीट टू सीट चर्चा करणार आहे. शिवसेनेसोबतच्या युतीनंतर भाजप महाराष्ट्रात लोकसभेच्या 25 जागा लढवणार आहे. मात्र त्यापैकी पाच विद्यमान खासदारांना वगळलं जाईल, असं म्हटलं जात आहे.
सध्या ईशान्य मुंबईच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद आहे. किरीट सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे. शिवाय भाजपच्या विद्यमान आमदारांचाही सोमय्यांना विरोध असल्याचं कळतं.
किरीट सोमय्या पुन्हा निवडून येण्याबाबत भाजपमध्ये साशंकता आहे. त्यामुळे त्यांना पर्याय सूचवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील निवडणूक समितीकडे केली आहे.