मुंबई: महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यायलेल्या आणि राज्यातील जनतेची नस अचूक माहिती असणाऱ्या अनुभवी काकांची साथ सोडून भाजप आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांची सध्या प्रचंड कोंडी झाल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्याने अजित पवार यांची महायुतीमधील बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपल्याची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे काका शरद पवार (Sharad Pawar) यांनी उरलेल्या साथीदारांना सोबत घेऊन त्यांच्या पक्षाची मोट नव्याने आणि भक्कमपणे बांधायला सुरुवात केली आहे. अशा पडत्या काळात महायुतीमधील (Mahayuti) दोन साथीदार आपल्याला सांभाळून घेतील, ही अजित पवार यांची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे, यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जाते. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपापूर्वीच बाहेर पडावे, यासाठी भाजप आणि शिंदे गटानेच (Shivsena Shinde Camp) चक्रव्यूह रचल्याची चर्चा असून अजितदादा या चक्रव्यूहात पुरते अडकल्याचे सांगितले जात आहे. 'दैनिक लोकसत्ता'ने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे. 


या वृत्तानुसार महायुतीमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी जोरदार चढाओढ सुरु आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत 160 जागा लढवण्याचा चंग बांधल्याने शिंदे गट आणि अजितदादा गटापैकी एकाला जागावाटपात नमते घ्यावे लागणार, हे स्पष्ट आहे. तसे न झाल्यास महायुतीत बाका प्रसंग उद्भवू शकतो. यादृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाने जागावाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास आपल्याला अधिकाअधिक जागा लढवता येतील, अशी रणनीती आखल्याची माहिती 'दैनिक लोकसत्ता'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 


भाजप आणि शिंदे गटाचा नेमका प्लॅन काय?


गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटाचे नेते हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लीम समाजाच्या विरोधात वापरलेली भाषा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रुचली नव्हती. याविरोधात दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करु, असा इशाराही अजितदादा गटाने दिला होता. मात्र, 'अजित पवार यांना जिथे कुठे तक्रार करायची असेल तिथे करु द्या' असे म्हणत नितेश राणे यांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचे दाखवून दिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नितेश राणे यांच्या हिंदुत्त्ववादी विचारसरणीचे समर्थन केले होते. त्यामुळे नितेश राणेंबाबतच्या अजित पवार यांच्या तक्रारीला भाजप फारशी किंमत देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.


तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. भाजपच्या अनिल बोंडे यांनीही गायकवाडांच्या या वक्तव्याची री ओढली होती. याबाबतही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु, भाजप नेतृत्व अजित पवार यांच्या नाराजीची कितपत दखल घेईल, याबाबत साशंकताच आहे. 


किंबहुना महायुतीमध्ये अजित पवार यांची कोंडी व्हावी, यासाठीच अशाप्रकारची रणनीती वापरली जात असल्याचे मानले जात आहे. जेणेकरुन भाजप आणि शिंदे गटाचे कट्टर हिंदुत्त्व आणि विरोधकांना नेस्तनाबुत करण्याची पद्धत अजित पवार यांना मान्य नसेल तर त्यांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा असेल, असा अप्रत्यक्ष संदेश भाजप आणि शिंदे गटाकडून दिला जात असल्याची चर्चा आहे.


अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर किंगमेकर होणार?


अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडल्यास विधानसभा निवडणुकीला त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सर्व जागांवर उमेदवार उभे करता येतील. अशावेळी अजित पवार यांनी स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर 15 ते 20 आमदार निवडून आणले तरी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण होऊ घातलेल्या संभाव्य त्रिशंकू परिस्थितीत अजित पवार किंगमेकर ठरु शकतात. त्यावेळी अजित पवार यांना हव्या त्या गोष्टी पदरात पाडून घेता येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आणखी वाचा


... तर राजकारणातून निवृत्ती घेईन; अजित पवारांनी खडसावल्यानंतर उमेश पाटलांची घोषणा