रायपूर : अखेर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भूपेश बघेल यांची वर्णी लागली आहे. भूपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली असून पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेश आणि राजस्थाननंतर छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चांगलीच कसरत करावी लागली.


मध्य प्रदेश आणि राजस्थानपेक्षा छत्तीसगडमधील नाव निश्चित करणे कठीण होते. कारण इथे मुख्यमंत्रिपदासाठी दोन नव्हे तर चार-चार दावेदार होते. यामध्ये अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली. बघेल यांच्याशिवाय टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरणदास अनंत यांच्या नावाचीही चर्चा होती. भूपेश बघेल यांच्या नावाचा प्रस्ताव टीएस सिंहदेव यांनी ठेवला. या प्रस्तावाला ताम्रध्वज साहू आणि चरणदास महंत यांनी अनुमोदन दिले.

भूपेश बघेल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले भूपेश बघेल हे आक्रमक नेते आहेत. 90 जागा असलेल्या छत्तीसगड विधानसभेत काँग्रेसने 68 जागांवर विजय मिळवला आहे. नव्या आमदारांचे नेतृत्व आता बघेल यांच्याकडे देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकांपासून ते स्थानिक निवडणुकांसाठी त्यांनीच नियोजन केले आहे.

भूपेश बघेल यांचा परिचय
भूपेश बघेल पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. 23 ऑगस्ट 1961साली बघेल यांचा जन्म छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील पाटण तालुक्यात झाला. 1985 पासून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी 80 च्या दशकात काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली होती. दुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. ते 1990 ते 94 पर्यंत जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. 1993 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.  1993 ते 2001 या कालावधीत ते मध्य प्रदेश गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष होते. 2000 मध्ये जेव्हा छत्तीसगड वेगळे राज्य झाले तेव्हा ते पाटण मतदारसंघातून निवडून आले. याचदरम्यान ते कॅबिनेट मंत्रीही झाले. 2003 मध्ये काँग्रेस सत्तेतून बाहेर झाल्यानंतर भूपेश यांना विरोधी पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. 2014 मध्ये त्यांना छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले.