मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळीतील कोस्टल रोडमुळं बाधित होणाऱ्या मच्छिमारांची भेट घेतली . प्रकल्पाला विरोध करणाऱ्या वरळीतील स्थानिकांशी त्यांनी संवादही साधला. कोस्टलरोडमुळे मासेमारी धोक्यात येत असल्यानं कोळी बांधवांचा याला विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याची माहिती राज ठाकरेंना कोळी बांधवांच्या वतीनं देण्यात आली होती.


कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वीच राज ठाकरेंनी मच्छिमारांची भेट घेतली आहे.

तांत्रिक गोष्टी पहिल्या तर प्रशासन यातून मार्ग काढू शकतो मात्र जर प्रशासनाने आठमुडेपणा ची भूमिका घेतली तर संघर्ष करावा लागेल अशी भूमिका आता मनसेने घेतली आहे. त्यासाठी राज ठाकरे  मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत.

प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असणार आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसंच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे. मात्र प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सि-लींकचा कोस्टल रोडच्या टप्प्याला विरोध आहे. कारण, इथं आधीच वांद्रे-वरळी सी-लिंक उभा आहे आणि आता याच ठिकाणी आणखी कोस्टल रोडचे पिलर उभे राहतील. त्यामुळे समुद्रात होड्यांची ये-जा करणं कठीण होणार आहे.

वरळी कोळीवाडा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. परंतु कोस्टल रोडमुळे ही व्होट बँक शिवसेनेपासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोस्टल रोडवरुन मनसे-शिवसेनेत राजकारण तापणार, असंच चित्र आहे.

कोळी समाजाच्या मागण्या काय आहेत?

  • कोस्टल रोडच्या मार्गातून नौकांची ये-जा करण्यासाठी दोन पिलरमधील अंतर कमीत कमी 200 मीटर असावं.

  • समुद्रातील मासेमारीची पारंपारिक जागा मासेमारीसाठीच राखीव ठेवावी.

  • माऊंटमेरी ते बाणगंगेपर्यंत गेली अनेक वर्ष कोळी समाजाच्या पारंपारिक मासेमारी पद्धतीच्या जाळ्या विखुरलेल्या आहेत, त्या जागा सुरक्षित राहाव्यात.

  • वादळात लोटस जेट्टी येथे कोळी आपल्या नौका नांगरत असतात, ते बंदर सुरक्षित रहावे.

  • कोस्टल रोडसाठी वरळी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत समुद्रात भराव टाकला तर भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी वरळी कोळीवाड्यात आणि आजुबाजूच्या प्रदेशात शिरण्याची शक्यता आहे.


कोस्टल रोड हा विकासाचा महामार्ग ठरणार असला तरी त्यामुळे येणाऱ्या छुप्या संकटांचा सध्या अंदाजही लावला जाऊ शकत नाही.समुद्रात भराव टाकल्यानंतर भरतीच्या, वादळाच्या वेळी निर्माण होणारी परिस्थिती ही हजारो जीवांवर बेतणारी असू शकते.

कोस्टल रोड कसा आहे?

  • प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवलीपर्यंत एकूण 35.6 किमी लांबीचा कोस्टल रोड असणार आहे.

  • समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून तसेच पूल आणि बोगदा असे गुंतागुंतीचे हे बांधकाम असणार आहे.

  • कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी 5303.34 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

  • एकूण प्रकल्पाचा खर्च विविध करांमुळे तब्बल 12 हजार 721 कोटींवर पोहचला आहे.

  • कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरापर्यंतचा प्रवास सुस्साट होणार आहे.

  • हा प्रकल्प झाल्यास दरवर्षी 34 टक्के अर्थात 350 टन इंधनाची बचत होणार आहे.

  • या मार्गावरच पावणेतीन मीटर रुंदीची बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल. तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल.

  • हा मार्ग पॉट होल फ्री व्हावा अर्थात खड्डे पडू नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाणार आहे.


संबंधित बातम्या

मुंबईकरांना हवाहवासा वाटणारा कोस्टल रोड कोळी बांधवांना नकोसा 

कोस्टल रोडवरुन मनसे-शिवसेना आमनेसामने