Madha Loksabha Election : लोकसभेच्या निवडणुकीचे (Loksabha Election) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक इच्छुकांनी निवडणुकीला उभारण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Loksabha) भारतीय जवान किसान पार्टीने वायुदलातील निवृत्त अधिकारी गोपाळ जाधव (Gopal Jadhav) यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी गोपाळ जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे.  


शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली घोषणा


नुकतीच स्थापन झालेली माजी सैनिकांची संघटना आणि शेतकरी संघटना यांच्याकडून वायुदलात निवृत्त अधिकारी गोपाळ यशवंत जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही आघाड्यांपासून समान अंतर ठेवून समविचारी पक्षांना एकत्र करून निवडणूक लढवणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. सध्या भाजप हा डम्पिंग ग्राउंड झाला असून देशाची अवस्था अशाच पद्धतीने करु लागले आहेत असे पाटील म्हणाले. आज एक भाऊ सीमेवर जवान म्हणून  ढतोय तर दुसरा शेतात राबतोय मात्र दोघेही नाखूष असल्यानेच हा पर्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे  रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलं. यावेळी माढा लोकसभेसाठी नाव जाहीर झालेले उमेदवार गोपाळ जाधव हे आपल्या सैन्यदलातील पोशाखात उपस्थित होते.


भाजपकडून कोण निवडणूक लढवणार?


माढा लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवार यांचे वर्चस्व राहिल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, 2019 च्या लोकसभेत या मतदारसंघात भाजपने मुंसडी मारली होती. रणजितसिंह निंबाळकरांनी अकलूजच्या मोहिते पाटलांच्या साथीनं माढ्याचा गड सर केला होता. मात्र, आता या दोघांमध्ये सगळं काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळं या मतदारसंघात भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच असं म्हणत गाठी भेटी सुरु केल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली आहे. पाहुयात माढा लोकसभा मतदारसंघातील सध्याची स्थिती.


महत्वाच्या बातम्या:


 Madha Lok Sabha : निंबाळकर की मोहिते पाटील? भाजपसमोर माढ्याचा गड राखण्याचं आव्हान, तर पवारांच्या मनात नेमकं काय?