Aurangabad Municipal Corporation :  मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या महानगरपालिका स्थापन होऊन तब्बल 39 वर्षे झाली आहेत. 08 डिसेंबर 1982 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेची स्थापना झाली. सुरुवातीची पाच वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू होता. त्यानंतर 17 एप्रिल 1988 मध्ये 60 जागांसाठी पहिली निवडणूक झाली. त्यांनतर आलेल्या निकालावेळी पक्ष स्थापन झाल्यानंतर तिसऱ्याच वर्षी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेनेने 28 जागांवर भगवा फडकवला. मात्र काँग्रेस, दलित पॅथर, मुस्लिम लीग आणि अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे 17 मे 1988 रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून काँग्रेसचे डॉ. शांताराम काळे आणि तर उपमहापौर म्हणून मुस्लीम लीगचे तकी हसन यांची निवड झाली. 


औरंगाबाद महापालिकेचा राजकीय इतिहास


औरंगाबाद महानगरपालिकेचा राजकीय इतिहास पाहिला असता सर्वाधिक काळ शिवसेना आणि भाजप युतीच्या ताब्यात महानगरपालिका राहिली आहे. औरंगाबाद महापालिकेचे सुरवातीचे प्रशासकीय पाच वर्षे सोडले तर, त्यानंतर आतापर्यंत झालेल्या 22 महापौरच्या यादीत 18 वेळा शिवसेनेचा तर 4 वेळा भाजपचा उमेदवार महापौराच्या खर्ची वर बसल्याचा इतिहास आहे. तर काँग्रेसला सुद्धा तीन वेळा महापौरपद मिळाले आहे. 1998 ते 2020 या काळात शिवसेनेकडून मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शिला गंजाळे, सुदाम सोनवणे, विकास जैन, विमल राजपूत, रुख्मिणी शिंदे, किशनचंद तनवाणी, अनिता घोडेले, कला ओझा, त्र्यंबक तुपे आणि नंदकुमार घोडेले यांनी महापौरपद भूषवले आहे.


भाजप, शिवसेना, एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक


औरंगाबाद महानगरपालिकेच पक्षीय बलाबल पाहिले तर महापालिकेत 115 नगरसेवक आहे. ज्यात शिवसेनेचे 29 तर, भाजपचे 22, एमआयएमचे 25 ( ज्यातील 4 जण आता पक्षात नाहीत ), काँग्रेस 10, बहुजन समाज पार्टीचे 05, राष्ट्रवादीचे 04, रिपाइं (डी) 02 आणि अपक्ष 18 असे नगरसेवक गेल्या निवडणुकीत निवडून आले होते. आता नव्याने झालेल्या वार्ड रचनेनुसार 124 नगरसेवक असतील.


नेत्यांनी कसली कंबर


आगामी महानगरपालिका निवडणुकीचा विचार केला तर औरंगाबादमध्ये सर्वच पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यात शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना आमदार अंबादास दानवे हे महत्वाचे नेते ठरणार आहे. तर जिल्ह्यात रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे दोन चेहरे सुद्धा शिवसेनेकडून प्रचाराच्या मैदानात असणार आहे. तर भाजपकडून केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांची एंट्री सुद्धा असणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर भाजप आमदार अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, विजया राहटकर,संजय केनेकर यांची महत्वाची भूमिका असणार आहे.