"केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र" हा नारा घेऊन निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या लाटेत काँग्रेसचे अनेक दिग्गज पराभूत झाले. पण वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघात काँग्रेसने आपला बालेकिल्ला परत मिळवला. या मतदारसंघात पहिल्यापासून काँग्रेसचाच वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघात दोन पक्षातल्या थेट लढतीची परंपरा आहे. सत्ता आल्यास राज्यात मंत्रीपद देण्याचं आश्वासन स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी त्यावेळी दिल्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा काँग्रेसनं ही जागा राखली खरी, पण यावेळची वाट भाजप किवा काँग्रेसला सहज शक्य नाही. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना अंतर्गत गटबाजी निस्तारण्यासोबतच इतरही आघाड्यांवर लढावं लागणार आहे. सरळ लढतीचा हा मतदारसंघ कुणाच्या पारड्यात सत्ता टाकणार?

आर्वी विधानसभा मतदारसंघात काळे घराण्याचाच वरचष्मा राहिला आहे. आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश आहे. 1962 मध्ये अपक्ष उमेदवार नारायण काळे निवडून आले. 1967 मध्ये काँग्रेसचे जे.पी. कदम आमदार राहिलेत. 1972 मध्ये अपक्ष धैर्यशील वाघ आणि1978 मध्ये शिवचंद चुडीवाल अपक्ष आमदार होते.  1980 मध्ये शिवचंद चुडीवाल काँग्रेसच्या तिकीटावर आमदार बनले. त्यानंतर 1985, 1990, 1995, 1999 असे सलग चारवेळा शरद काळे काँग्रेसकडून आमदार झाले. शरद काळे यांना राज्यात मंत्रीपदही मिळालं. शरद काळे यांचे चिरंजीव अमर काळे यांना घरीच राजकारणाचं बाळकडू मिळालं. 2004 मध्ये अमर काळे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले. 2009 मध्ये आर्वीला झालेल्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांनी अमर काळे विजयी झाल्यास राज्यात मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता. पण अमर काळे यांचा पराभव करत दादाराव केचे यांनी प्रथमच या मतदारसंघात भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी अमर काळे फक्त तीन हजार 130 मतांनी पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीत अमर काळे यांनी दादाराव केचे यांचा पराभव करत काँग्रेसची जागा परत मिळवली. यावेळीही विजयाचं अंतर तीन हजार 143 मतांचंच राहिलं. आता पुन्हा येणाऱ्या निवडणुकीत चांगलीच घमासान लढत होण्याचे संकेत आहेत.

आर्वी मतदारसंघातील आर्वी नगरपालिका, आर्वी, आष्टी, कारंजा पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे. आष्टी नगर पंचायत, कारंजा नगर पालिका काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात तीन जिल्हा परिषद सदस्य काँग्रेस, एक शेतकरी संघटना तर अन्य भाजपचे आहेत. या मतदारसंघात बसपा उमेदवार कायम तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. आर्वी शहर कुणाकडे झुकते यावर जय पराजयाचं गणित अवलंबून असतं. आर्वी मतदारसंघात आता भाजपची पाळेमुळे चांगलीच पसरली आहेत. पूर्वीचा सहकार गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीला आर्वी मतदारसंघही अपवाद नाही. कारंजा तालुक्यातील भोयर, पवार समाजाला डावलणं जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला महागात पडलं होतं. आर्वीच्या गेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार औषधालाही निवडून आला नाही. हा निकाल काँग्रेसला जबर धक्का देणारा राहिला. त्यासाठी काही अंशी अमर काळे यांच्याबद्दलची नाराजी कारणीभूत ठरल्याच बोललं जातंय. दुसरीकडे भाजपने मतदारसंघावर पकड अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना या मतदारसंघात जेमतेम आहे. सहकार गटाचा बऱ्यापैकी बोलबाला आहे. पण जिल्हा सहकारी बँक रसातळाला पोचली असून कृषी उत्पन्न बाजार समिती आणि स्वतःच्या संस्थांच्या बाहेर अजून तरी यांची सत्ता पोचली नाही. ऐन निवडणुकीत वेळेवर कार्यकर्त्यांना कामाला लावायचं. त्यानंतर पाच वर्षे ढुंकूनही पाहत नसल्याने राष्ट्रवादीची परिस्थिती गंभीर आहे. विद्यमान आमदार अमर काळे यांनाही ही निवडणूक सहजगत्या पार करणं शक्य होणार नाही. इथली लढत अटीतटीची असणार आहे. भाजपलाही अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागू शकतो.


भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी

माजी आमदार दादाराव केचे हे भाजपच्या तिकिटासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यांनी पाच वर्षात मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला. सरकार भाजपचं असल्यामुळे विकासकामांकरिता निधी आणण्याचा प्रयत्नही केला. त्यांच्यापुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार म्हणून ओळख असलेले सुधीर दिवे यांचं आव्हान असणार आहे. दिवे यांनी अनेक उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत दावेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. सहकार नेते श्रीधर ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे हेदेखील भाजपकडून लढण्यास इच्छूक आहेत. ते भाजपमध्ये गेले नाहीत. पण नितीन गडकरी यांच्याशी निकटचे संबंध आणि ज्या पद्धतीने बचतगटांसाठी काम सुरू केलं, त्यावरून तिकीटाबाबत राहुल ठाकरेदेखील आग्रही असल्याचं दिसतं. शिवसेनेकडून बाळा जगताप उमेदवारी मागू शकतात. शिवाय अपक्ष म्हणून काही नवीन चेहरे रिंगणात उतरू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीप काळे तिकीट मागण्याची शक्यता आहे. विदर्भ राज्य आघाडीकडून गजानन निकम रिंगणात उतरू शकतात. येथे युवा स्वाभिमान पार्टीकडून दिलीप पोटफोडे उमेदवार राहू शकतात. बहुजन वंचित आघाडीचाही येथे उमेदवार राहण्याची शक्यता आहे.


मतदारसंघातील प्रश्न


  • मोठा उद्योग नावालाही नाही. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे.

  • कारंजा भाग संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जायचा. पण आता पाण्याअभावी संत्रा बागा उदध्वस्त होत आहेत. सिंचनाची सुविधा फारशी नाहीच. उन्हाळ्यात कारंजा शहरासह तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होतो.

  • संत्रा निर्यात प्रकल्प नावापुरताच दिसतो.

  • आष्टी तालुक्यात सिंचन, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. आष्टीला स्वातंत्र्य लढ्याचा मोठा इतिहास आहे. पण राष्ट्रीय शहीद स्मारकाचा प्रश्न प्रलंबित आहे.

  • वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे.

  • आर्वी, आष्टी तालुका गवळावू जनावरांसाठी प्रसिध्द आहे. पण आता त्या जनावरांची संख्याही कमी होतेय. कन्नमवारग्रामचं गवळावू पशु पैदास केंद्र नावालाच आहे.

  • आर्वी, आष्टी आणि कारंजा या तिन्ही तालुक्यातील शेकडो गोपालक उन्हाळ्यात जनावरांना घेऊन स्थलांतर करतात, पण यावर उपाययोजना शून्य आहे. सिंचनाची वानवा आहे. प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.