मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीला निवडून देण्याचं आवाहन करत भाजप नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर, महाविकास आघाडीला विजयी करण्याचं आवाहन करत बडे नेतेही महाराष्ट्रात दौरे करत आहेत. मात्र, यंदा तीन-तीन पक्षांची आघाडी व युती असल्याने निवडणुकीचा अंदाज बांधता येईना अशी परिस्थिती झालीय. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेसह गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाच्या आधारावर मत मागितले जात आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते उद्योगधंदे गुजरातला नेले, संविधान आणि धार्मिक विभाजनावरुन टीका करत आहेत. त्यातच, आता उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी महाराष्ट्रातील जनतेला, त्यातच हिंदूंना आवाहन केलं आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं कौतुकही केलंय.


उत्तराखंडमधील ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हा निर्णय घेऊन महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे काम केले, अशा शब्दांत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केले. आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. मात्र, जे गायीसाठी उभे राहिले, त्यांचे आम्ही कौतुक करणार नाही तर कोणाचे करणार, असे म्हणत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन महाराष्ट्रातील समस्त हिंदूंना केले आहे. दरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी काही महिन्यांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिले होते. तसेच, जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रातील लोकांना शांतता मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.


एकनाथ शिंदेंचं यापूर्वीही केलं होतं कौतुक


शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी मातोश्रीवरील भेटीनंतर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली होती. या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव वर्षा या निवासस्थानी भेट देऊन महायुती सरकारच्या निर्णयाचे स्वागत व कौतुक केले होते. महायुती सरकारने राज्यातील देशी गाईंना राज्यमाता असा दर्जा दिल्याच्या निर्णयाचं कौतुक करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशीर्वाद दिले होते. त्यानंतर, आता ऐन निवडणुकीच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कौतुक करत महायुती सरकारला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे.  


हेही वाचा


अजित पवार म्हणाले 1 लाख मताधिक्यांनी निवडून येणार; आता, युगेंद्र अन् रोहित पवारांचा पलटवार