मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस असून सर्वच दिग्गज नेतेमंडळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत असून बहुतांश जागेवरील उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांकडून अपक्ष किंवा पक्षाचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. सिंधुदुर्ग (Sidhudurg) जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना वडिलांच्या म्हणजे नारायण राणेंच्या पराभवाची आठवण करुन दिली. तसेच, वडिलांच्या पराभवाची जागा मला परत मिळवायची आहे, असेही निलेश राणेंनी (Nilesh Rane) यावेळी म्हटलं. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून कुडाळमधून वैभव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


ज्या चिन्हावर माझ्या वडिलांची राजकीय सुरुवात झाली, त्याच चिन्हावर माझ्या राजकारणाची सेकंड इनिंग सुरू होतेय, असे म्हणत निलेश राणेंनी शिवसेनेतील पक्षप्रवेशावर भाष्य करत आता दुसरी इनिंग सुरू झाल्याचं म्हटलंय. शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल मला सगळ्यांचेच आभार मानावे लागतील, शिंदे साहेबांचे तर मानावेच लागतील, त्यांच्या नेत्यांचे आम्हाला आभार मानावे लागतील. कारण, दोनदा पराभव झाल्यानंतरही संधी माझ्यावर विश्वास टाकून मला ही संधी दिली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. 


मागे काय घडलं त्यापेक्षा उद्यासाठी काय प्लॅनिंग करू शकतो हे विचार करणारा मी व्यक्ती आहे. राणेसाहेबांच्या नेतृत्वात मी तयार झालेलो आहे. म्हणून, मागे जे झालं ते झालं त्यात सुधारणा कशी करायची, उद्यासाठी चांगलं कसं करायचं, त्याची प्लॅनिंग आणि त्याचा नियोजन राजकारणामध्ये गरजेचं आहे. मला जिंकण्यासाठी काय करावे लागेल तेवढेच मी मागच्या दहा वर्षात लक्षात ठेवलं आहे. आता, देवाच्या कृपेने उमेदवारी मिळाली आहे. आता, निकाल 23 तारखेला लागेल, मला एवढी खात्री आहे की आमच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल, मोठ्या मताधिक्यात निवडून येईल, असे निलेश राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले.



वडिलांचा पराभव झाली, ती जागा परत मिळवायची


मी कोणाला हरवण्यासाठी ही निवडणूक लढवत नाही, काहीतरी चांगलं घडवण्यासाठी, चांगलं करण्यासाठी मी निवडणूक लढतोय. मागे देखील मी बोललो होतो की, जिथे माझ्या वडिलांचा पराभव झाला ती जागा मला परत मिळवायची आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी यंदाच्या निवडणुकीतील विजयाचा निर्धार बोलून दाखवला आहे. 


हेही वाचा


Amit Thackeray: आदित्य ठाकरेंनाही शुभेच्छा...; उमेदवारी अर्ज भरताच अमित ठाकरेंनी मनातलं सांगितलं, काय म्हणाले?