Amravati Loksabha : लोकसभा निवडणुकीबाबतचा 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स'चा एक्झिट पोल समोर आलाय. महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतीबाबतही अंदाज समोर आले आहेत. अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा बाजी मारताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे या मतदारसंघात पिछाडीवर जाताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करतानाच नवनीत राणांना (Navneet Rana) यश मिळण्याची शक्यता आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश
नवनीत राणा (Navneet Rana) 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी सातत्याने भाजप पुरस्कृत भूमिका घेतली. शिवाय हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर राणांनी थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला होता. त्यामुळे त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. दरम्यान, महायुतीकडून निवडणूक लढवली. मात्र, राणांना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा विरोध असल्याचेही बोलले गेले.
अमरावतीमध्ये तिरंगी लढत
अमरावती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. भाजपने नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस बळवंत वानखेडे यांना मैदानात उतरवले होते. तर दुसरीकडे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही दिनेश बूब यांना उमेदवारी देत तिरंगी लढत केली होती. बच्चू कडू यांनी सभेच्या मैदानावर थेट भाजपशी पंगाही घेतला होता. मात्र, दिनेश बूब यांच्या उमेदवारीचा फायदा नेमका कोणाला होतो याकडे सर्वांचे लक्ष होते. सध्या तरी एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नवनीत राणा आघाडी घेताना दिसत आहेत.
तिरंगी लढत असल्याने दिनेश बूब नवनीत राणांची मतं कमी करणार की, बळवंत वानखेंडेना धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, लहान मुलाला जरी विचारलं तरी सांगेन की नवनीत राणांचा पराभव होईल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत बच्चू कडू यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.
इतर महत्वाच्या बातम्या