मुंबई : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. अमित शाह यांनी शिराळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. अमित शाह यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी देखील आक्षेप घेतले आहेत.
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली. अमोल मिटकरी म्हणाले, "शिराळा येथील सभेत केंद्रीय मंत्री श्री अमितजी शहा यांनी छ.शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रात त्यांना स्क्रिप्ट कोणी लिहुन दिली हे शोधलं पाहिजे. बाहेरून येणाऱ्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय त्या विषयावर बोलू नये."
अमित शाह काय म्हणाले?
समर्थ रामदास यांचे पाय या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं. त्या समर्थ रामदासांना मी नमन करतो. अमित शाह यांनी शिराळ्यात भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारसभेत वक्तव्य केलं.
संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले?
अमित शाह असे बोलले आहेत का या संदर्भात मला कल्पना नाही. संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील. मात्र छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास यांना जोडलं जाणं योग्य नाही, असं म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु केवळ राजमाता जिजामाता होत्या. समर्थ रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडणं योग्य नाही हे न पटणारं आहे, असंही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
इंद्रजीत सावंत काय म्हणाले?
मातोश्री जिजाऊ साहेब आणि पिताजी शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतून 1642 पासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. 1642 ते 1672 या कालावधीत शिवाजी महाराजांच्या संबंधांमध्ये समर्थ रामदासांचे नाव ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कुठेही नोंदवलेलं नाही. त्यामुळे रामदासांनी तरुणांना शिवाजी महाराजांकडे जावून पाठिंबा द्यायला सांगितला आणि त्यांनी तरुण तयार केले ही भाकडकथा आहे. या भाकड कथेच्या आधारावरती भारताच्या गृहमंत्री साहेबांनी बोलणं चुकीच आहे, असंं इंद्रजीत सावंत म्हणाले.
इतर बातम्या :