मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) 49 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मनसैनिकांमध्ये (MNS) चैतन्य संचारले आहे. मनसेचे अनेक कार्यकर्ते बुधवारी अमित ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी जमले होते.
यावेळी मनसेकडून उमेदवारी मिळालेले नेतेही शिवतीर्थवर आले होते. तेव्हा शर्मिला ठाकरे यांनी अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचे औक्षण केले. तर मिताली ठाकरे यांनी त्यांचे पती अमित ठाकरे यांचे औक्षण केले. यावेळी शर्मिला ठाकरे आणि मिताली ठाकरे यांनी मनसेच्या उमेदवारांचे औक्षण करताना म्हटले की, 'आम्हाला ओवाळणीत एक रुपयाही नको, पण आमदारकी पाहिजे'.
अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शर्मिला ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शर्मिला ठाकरे यांचे डोळे पाणावले होते. त्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या की, ही सगळी माझी मुलं आहेत. या सगळ्यांनी आमदार व्हायला पाहिजे, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले. अमित ठाकरे यांच्यासमोर माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे ज्येष्ठ आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान असेल.
तसेच ठाकरे गटाने माहीम विधानसभेत अमित ठाकरे यांच्याविरोधात महेश सावंत यांना रिंगणात उतरवले आहे. महेश सावंत हे माहीममधील जुने कार्यकर्ते आहेत. त्यांचा मतदारसंघातील लोकांशी उत्तम जनसंपर्क आहे. या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्यासाठी माहीमची लढाई ही अवघड मानली जात आहे. अमित ठाकरे सदा सरवणकर आणि महेश सावंत या तगड्या नेत्यांचे आव्हान कशाप्रकारे परतवून लावणार, हे पाहावे लागेल.
कोण आहेत अमित ठाकरे
अमित ठाकरेंचा जन्म 24 मे 1992 चा आहे. अमित ठाकरेचं शिक्षण बॉम्बे स्कॉटिशमधून झालं असून आर ए पोतदार महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2019 मध्ये अमित ठाकरेंचा विवाह मिताली बोरुडे यांच्याशी झाला. पर्यावरणाबाबतही ते जागरूक असून अनेक पर्यावरणाचे कार्यक्रमही हाती घेत असतात. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
आणखी वाचा