Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024: मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Vidhan Sabha Nivadnuk 2024) मध्ये सर्वात रंजक लढत आता माहीम विधानसभा मतदारसंघात होणार आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना उमदेवारी जाहीर केल्यानंतर, उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर आज पदाधिकाऱ्यांच्या बैठीक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात शिवसेना शिंदेंकडून आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे विरुद्ध महेश सावंत अशी तिहेरी लढाई दादर माहीम मतदारसंघात होणार आहे.


महेश सावंत मातोश्रीवरुन बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले?


आज उद्धव साहेबांना माहीममधून माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे. आम्ही सगळेजण मेहनत करुन आम्ही पुन्हा डौलाने माहीम मतदारसंघावर, प्रभादेवी, दादरवर शिवसेनेचा भगवा फडकवणार आहोत. कितीजणांचं आव्हान असेल, तरी जनतेला रोज, रात्री-अपरात्री भेटणारा उमेदवार जनतेला भेटलाय, जनतेच्या मनातला उमेदवार भेटलाय.  त्यामुळे आम्हाला कोणाचं आव्हान वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना जशी काम करते, तसंच आम्ही काम करणार आहोत. शेवटी विजय ठाकरे गटाचाच होणार आहे. 23 तारखेला आम्ही जल्लोषमध्ये आम्ही तुमच्याशी बोलू. पक्षप्रमुखांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र बसवलं. आम्हाला म्हणाले की, मला बाकी काही नको, माहीमवर भगवा फडकलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचे महेश सावंत यांनी म्हटले.


अमित ठाकरेंसाठी विधानसभेची वाट खडतर... 


मनसेकडून आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभेतून उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच पुतण्या उभा राहिल्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवारी देणार नाहीत, असं बोललं जात होतं. पण अखेर ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी दिल्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. 


2019 मध्ये पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं वरळीमधून विजय मिळवला होता. त्यावेळी मनसेनं मात्र, वरळीत उमेदवार दिला नव्हता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकारणापलीकडे कौटुंबिक नातं जपत आपले पुतणे आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे माहीममधून जर अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर ठाकरे गटाकडूनसुद्धा उमेदवार देण्यात येऊ नये, असा एक मतप्रवाह शिवसेना ठाकरे गटात आग्रही होता. पण सध्याची परिस्थिती वेगळी आहे. 


शिवसेनेतील बंडानंतर राज्यातील राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली आहे. अशातच यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक जागा मिळवणं ठाकरेंसाठी आव्हान तर आहेच, पण तितकंच त्यांच्या पक्षासाठीही महत्त्वाचं आहे. तसेच, माहीम म्हणजे, शिवसेनेचा बालेकिल्ला. त्यामुळे आपला बालेकिल्ला पुन्हा मिळवणं ठाकरेंसाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे ठाकरेंचे शिलेदार माहीमचा बालेकिल्ला पुन्हा मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.